-
नेपाळ सरकारने सोशल मीडियावर अचानक बंदी आणल्यानंतर तिथे तरुण पिढीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून अनेक नेत्यांची घरे जाळली गेली आहेत. वाढत्या दबावामुळे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला असून सुरक्षा व्यवस्थेची धुरा आता नेपाळ सेनेकडे गेली आहे.
-
भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांची ऐतिहासिक व भौगोलिक नाती घट्ट असून, भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांची नेपाळशी थेट सीमा जोडलेली आहे. हिमालय ते तराई पट्ट्यापर्यंत पसरलेल्या या सीमेमुळे दोन्ही देशांमध्ये मुक्तपणे वावर आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होत आली आहे.
-
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी, बहराइच, महाराजगंज यांसारख्या सात जिल्ह्यांची नेपाळशी जोडणी आहे. या भागांतील धार्मिक व कौटुंबिक संबंधांमुळे लोकांची वर्दळ नेहमीच जास्त असते. सध्या मात्र सुरक्षा दलांनी सीमावर्ती ठिकाणी विशेष नजर ठेवली आहे.
-
उत्तराखंडमधील पिथौरागढ, चंपावत आणि उधमसिंग नगर या जिल्ह्यांमधून नेपाळची सीमा लागते. धारचुला व बनबसा ही येथील महत्त्वाची सीमावर्ती गावे आहेत.
-
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील पानीटंकी–काकरभिट्टा हा सीमावर्ती पट्टा ‘सिलिगुडी कॉरिडॉर’जवळ असल्याने रणनीतीदृष्ट्या संवेदनशील मानला जातो.
-
बिहारच्या पश्चिम चंपारण, सीतामढी, अररिया यांसारख्या सात जिल्ह्यांमधून नेपाळशी सीमा जोडलेली आहे. या भागातील सीमा परंपरेने उघडी असून सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणा यावर काटेकोर नजर ठेवून आहे.
-
सिक्कीम राज्यातील सोरेंग जिल्ह्यातून नेपाळला लागून असलेला छोटा सीमावर्ती पट्टादेखील महत्त्वाचा आहे. चीन-नेपाळ-भारत या त्रिसंधी भागामुळे येथे सैन्याची सतर्कता वाढवली आहे.
-
नेपाळमधील अस्थिरतेचा परिणाम सीमावर्ती भारतीय भागात होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा उच्च सजगतेवर आहेत.(Photo: AP)
Photos: नेपाळशी सीमा जोडणारी भारतातील ‘ही’ पाच राज्ये
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या सीमावर्ती भागात सुरक्षाव्यवस्था कडक.
Web Title: Nepal protests socialmedia ban unrest india nepal border tension svk 05