-
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याच्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरलाही महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आणि देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी गिफ्ट म्हणून पाठवलेली दमदार थार एसयूव्ही काल (दि.१) मिळाली.
-
अलिकडेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू जायबंदी असताना ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित पराभवाचं पाणी पाजणाऱ्या टीम इंडियातील सहा तरुण खेळाडूंच्या कामगिरीवर उद्योगपती आनंद महिंद्रा भलतेच खूश झाले होते आणि त्यांनी या तरुण खेळाडूंना एक शानदार गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतात येताच आनंद महिंद्रा यांनी आपल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची ढासू ऑफ रोडर एसयूव्ही THAR टीम इंडियाच्या सहा तरुण खेळाडूंना गिफ्ट म्हणून देणार असल्याचं जाहीर केलं होतं. तो शब्द त्यांनी पाळला.
-
-
तरुण खेळाडूंनी भारतातील भविष्यातील तरुण पिढ्यांसाठी स्वप्न पाहण्याची आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांचं मनोबल वाढावं म्हणून थार एसयूव्ही गिफ्ट केल्याचं महिंद्रांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.
-
त्यावर महिंद्रांकडून थार भेटल्यानंतर नटराजनने ट्विटरद्वारे चांगल्या लोकांचा पाठिंबा आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे अशक्यप्राय गोष्टी करणं शक्य झालं, अशी प्रतिक्रिया दिली. नटराजनपाठोपाठ शार्दुलनेही महिंद्रांकडून थार मिळाल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
-
"भारतासाठी क्रिकेट खेळणं माझ्यासाठी जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. माझा हा प्रवास खूप वेगळा होता. या प्रवासात मला जे प्रेम आणि आपलेपण मिळालंय ते पाहून मी भारावून गेलो आहे. चांगल्या लोकांचा पाठिंबा आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे अशक्यप्राय गोष्टी करणं शक्य झालं", असं नटराजनने ट्विटरद्वारे सांगितलं. दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने, "मी आज महिंद्रा थार चालवत घरी पोहोचलो आहे. आनंद महिंद्रांचे आभार मानतो, ज्यांनी माझा प्रवास ओळखला आणि प्रोत्साहन दिलं. तुमचं क्रिकेटवरील प्रेम बघून मला विश्वास आहे की माझी गाबा कसोटीतील ही स्वाक्षरीकृत जर्सी तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटेल", असं म्हणत नटराजनने गाबा कसोटीत त्याने घातलेली जर्सी स्वतःची स्वाक्षरी करत महिंद्रांना भेट म्हणून पाठवली. नंतर शार्दूलनेही महिंद्रांकडून थार गिफ्ट मिळाल्याची माहिती दिली.
-
"नवीन महिंद्रा थार आली….महिंद्राने खरंच अत्यंत जबरदस्त गाडी बनवलीये….ही एसयूव्ही चालवायला मजा येईल..खूप आनंद झालाय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आमच्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार श्री आनंद महिंद्राजी", असं म्हणत शार्दुलने महिंद्रांचे पुन्हा एकदा आभार मानले.
-
यापूर्वी महिंद्रांनी ढासू थार गिफ्ट करत असल्याचं जाहीर केल्यानंतर मराठमोळा शार्दुल ठाकूर भलताच खूश झाला होता. ऑस्ट्रेलियामधून परतताच त्याने 'थँक्यू सर' म्हणत महिंद्रांचे आभार मानले होते.
-
"थँक्यू सर… तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणं हिच माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे….तुमच्याकडून आलेलं गिफ्ट सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे….तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे अशक्य गोष्टी धुंडाळल्या पाहिजेत. तुम्ही दिलेल्या या गिफ्टसाठी मी आभारी आहे.", असं म्हणत शार्दुलने महिंद्रांचे आभार मानले होते.
-
दरम्यान, THAR ही महिंद्रा कंपनीची ऑफ रोडर एसयूव्ही असून भारतात लाँच झाल्यापासून ग्राहकांमध्ये या गाडीची चांगलीच डिमांड आहे. या गाडीची भारतात किती मागणी आहे हे यावरुनच लक्षात येतं की, बूक केलेल्यांनाही गाडी घरी नेण्यासाठी अनेक महिने वाट बघावी लागतेय. 10 ते 15 लाख रुपयांदरम्यान या दमदार एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत आहे.
मस्तच! मराठमोळ्या शार्दुल ठाकूरलाही मिळाली महिंद्रांनी गिफ्ट केलेली Thar SUV, म्हणाला…
यापूर्वी, “थँक्यू सर… तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणं हिच माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे…. असं म्हणत शार्दुलने मानले होते महिंद्रांचे आभार
Web Title: After t natarajan shardul thakur receives thar suv from anand mahindra says thank you once for recognising contribution on australia tour sas