-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी नवा इतिहास रचला आहे. यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला गेला आहे.
-
भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवून नवा इतिहास घडवला आहे. नीरज चोप्राने भारताला आज सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.
-
तर दुसरीकडे भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. तसेच कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. त्यामुळे सर्व स्तरावरुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे..
-
नीरज चोप्रा, बजरंग पुनिया आणि रवी दहिया हे तिघेही हरियाणाचे आहेत. या तिघांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर हरियाणा सरकारने पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला आहे.
-
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नीरजला 6 कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच त्याला क्लास वन ऑफिसरची सरकारी नोकरीही दिली जाणार आहे.
-
तर बजरंग पुनियाला अडीच कोटी रुपयांचे रोख बक्षीस आणि सरकारी नोकरी दिली जाणार आहे.
-
विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंना 50 टक्के सवलत देऊन जमीन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
-
त्याशिवाय बजरंग पुनियाच्या झज्जरमधील मूळ गाव खुदानमध्ये एक इनडोअर स्टेडियम देखील बांधण्यात येणार आहे.
-
तसेच नीरज चोप्रा वास्तव्यास असलेल्या पंचकुला शहरातही खेळाडूंसाठी एक केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राचा नीरज हा प्रमुख असेल.
-
दरम्यान याआधी हरियाणा सरकारने कुस्तीपटू रवी दहियाला 4 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यासोबतच त्याला क्लास वन ऑफिसरची सरकारी नोकरीही दिली जाईल, अशी घोषणा केली होती.
पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव, सहा कोटींपासून ते नोकरी, जमीन अन् बरंच काही…
Web Title: Haryana government rewards olympics medal winners offers job and plot to bajrang punia neeraj chopra ravi dahiya nrp