-
बोर व्याघ्र प्रकल्पानजीक सेलू तालुक्यातील डोंगरगाव तलावावर बहार नेचर फाऊंडेशनच्या वतीने पक्षीनिरीक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तलाव परिसरात केलेल्या पक्षीगणनेत धोकाग्रस्त प्रजातीसह पन्नास प्रजातीचे असंख्य पक्षी आढळून आले.
-
हिंगणी परिसरातील निसर्गसौंदर्य लाभलेल्या वनक्षेत्रात वसलेल्या डोंगरगाव तलावावर दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून शेकडो पक्ष्यांचे आगमन होत असते. तलाव परिसरातील पाण्याची पातळी कमी होताच पक्षी या परिसरात दाखल होतात. येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये अनेक प्रजातीचे पक्षी अभ्यासकांना पहावयास मिळतात.
-
बहार नेचर फाउंडेशनने वर्धा जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्षांची सूची प्रकाशित केली आहे असून त्यात नोंद असलेले अनेक पक्षी डोंगरगाव तलावावर आढळणारे आहेत.
-
या पक्षीनिरीक्षण व पक्षीगणना उपक्रमात बहारचे पंचवीस सदस्य सहभागी झाले होते. सकाळी आठला पक्षी निरीक्षणास सुरुवात करीत तलावाची सहा किलोमीटर परिक्रमा पूर्ण करण्यात आली.
-
यावेळी राजहंस, चक्रवाक, हळदीकुंकू बदक, कंठेरी चिखल्या, सामान्य तुतारी, सामान्य धीवर, पिवळा धोबी, छोटा आर्ली, करकोचे, काळा शराटी, मधुबाज, किंगफिशर इत्यादीसह तब्बल पन्नास प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
-
जागतिकदृष्ट्या संकटग्रस्त आणि संकटसमीप पक्ष्यांची यादी बर्डलाइफ इंटरनॅशनल ही शिखर संस्था प्रकाशित करीत असते. या यादीमध्ये धोकाग्रस्त प्रजातीत समाविष्ट असलेला नदीसुरय (रिव्हर टर्न) तसेच संकटसमीप प्रजातीत नोंद असलेले मोठा करवानक (ग्रेट थिक नी) आणि पांढऱ्या मानेचा करकोचा (वुली नेक स्टॉर्क) हे पक्षीही येथे आढळून आले.
-
पक्ष्यांच्या दृष्टीने डोंगरगाव तलावाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या सर्व नोंदी बहारद्वारे इ-बर्ड संकेतस्थळावरही टाकण्यात आल्या आहेत.
वर्ध्यात आढळल्या पक्षांच्या ५० प्रजाती, पहा दुर्मिळ फोटो
पन्नास प्रजातीचे असंख्य पक्षी आढळून आले
Web Title: Birds species in wardha sgy