-
करोना महासाथीमुळे दोन वर्षाच्या खंडानंतर श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित नववर्ष पालखी सोहळ्यात डोंबिवलीतील उत्सवप्रिय रहिवासी आनंदोत्सवाने सहभागी झाले होते.
-
टाळेबंदीमुळे दोन वर्षाचा रहिवाशांच्या मनात दबलेला उत्साह रस्त्यावर पालखी सोहळ्यात ओसंडून वाहत होता. शासनाने निर्बंधमुक्त महाराष्ट्राची घोषणा केल्यानंतर तर उत्साहाला भरते आले आणि बालगोपाळ, तरूण, ज्येष्ठ, वृध्द, दिव्यांगांनी पालखी सोहळ्यात हर्षोल्होसित सहभागी होऊन करोनाचे आसमंतात दाटलेले मळभ आणि लाटेचे इशारे दूर सारले.
-
मागील दोन वर्ष दिवाळी, नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त गर्दी नसल्याने दुर्मुखलेला फडके रोड शनिवारी गर्दी, आनंदाने ओसंडून वाहत होता.
-
चैत्रपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेचे दिवस जवळ आले तरी शासनाकडून करोना साथीचे निर्बंध हटविण्यात येत नव्हते. स्वागत यात्रा संयोजकांमध्ये अस्वस्थता होती.
-
अशा परिस्थितीत डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने निर्बंध पाळत कोणत्याही परिस्थितीत पालखी सोहळा काढण्याचा निर्णय घेतला.
-
डोंबिवलीतील रहिवासी, संस्था, संघटनांनी त्याला उत्स्फूर्त पाठींबा दिला.
-
फुलांची आणि गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली.
-
या मिरवणुकीत लहान -मोठ्या सर्वांनी सहभागी होत नववर्ष आणि गुढीपाडवा आनंदाने साजरा केला.