-
बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार कसा सुरू आहे. हे दिसून येत आहे. दररोज आरोपांची चिखलफेक सुरूच आहे. एक आघाडी सत्ता टिकवण्यासाठी झटतेय, तर दुसरी सत्तेवर विराजमान होण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. थोडक्यात नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी. (सर्व छायाचित्रं संग्रहित/जनसत्ता)
-
संग्रहित छायाचित्र
-
बेरजेचं राजकारण करत मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवणाऱ्या नितीश कुमार यांची यावेळी कसोटी लागली आहे. त्यामुळे यावेळी नितीश कुमार बिहारचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी ठरणार का? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. पण, त्याचबरोबर बिहारमधील एक कॉलेज निवडणुकीच्या निमित्तान चर्चेत आहे.
-
हे कॉलेज चर्चेत असण्याचं कारणही निवडणूकचं आहे. या कॉलेजनं बिहारला तब्बल चार मुख्यमंत्री दिले आहेत.
-
जेव्हा जेव्हा बिहारच्या राजकारणाची आणि नेत्यांची चर्चा सुरू होते, तेव्हा राज्यातील दोन शिक्षण संस्थांचा उल्लेख होतोच होतो. यातलं पहिल नावं म्हणजे पाटणा विद्यापीठ आणि दुसरं भागलपूर येथील टीएनबी (तेज नारायण बिनैला) कॉलेज. टीएनबी कॉलेजचं वैशिष्ट्ये म्हणजे याच महाविद्यालयाशी निगडीत असलेल्या चार व्यक्ती पुढे बिहारचे मुख्यमंत्री झाल्या.
-
यात पहिलं नाव आहे, दारोगा प्रसाद राय. राय हे बिहारचे दहावे मुख्यमंत्री होते. त्यांनी टीएनबी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं होतं. ते १६ फेब्रुवारी १९७० ते २२ डिसेंबर १९७० या काळात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय हे दारोगा प्रसाद राय यांचे पुत्र आहेत.
-
सत्येंद्र नारायण सिन्हा. सिन्हा यांचाही टीएनबी कॉलेजशी संबंध आला. त्यांनी काही काळ या महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर ते राजकारणात आले. पुढे ११ मार्च १९८९ ते ६ डिसेंबर १९८९ या कालावधीत ते बिहारचे मुख्यमंत्री होते.
-
भागवत झा आझाद. आझाद यांनी टीएनबी कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. माजी क्रिकेटपटू व राजकीय नेते कीर्ती आझाद हे त्यांचे पूत्र आहेत. भागवत झा आझाद हे १४ फेब्रुवारी १९८८ ते १० मार्च १९८९ पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते.
-
बिहारच्या राजकीय इतिहासात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहिलेले सतीश प्रसाद सिंह हे सुद्धा टीएनबी कॉलेजचे विद्यार्थी होते. ते २८ जानेवारी १९६८ ते १ फेब्रुवारी १९६८ म्हणजेच केवळ पाच दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री होते. ते काँग्रेसकडून खासदार म्हणूनही संसदेत गेले होते.
-
या व्यतिरिक्त इतरही नेत्यांनी या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेलं आहे. देशाचे माजी रेल्वेमंत्री ललित नारायण आणि बिहार विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवचंद्र झा यांच्यासारख्या नेत्यांचं शिक्षण याच महाविद्यालयात झालं.
‘या’ कॉलेजनं बिहारला दिले चार मुख्यमंत्री
२००५ पासून नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी
Web Title: Bihar elections bihar poll tnb college bhagalpur produce 4 cm of state bmh