-
तामिळनाडूमधील एका मुलीने ५८ मिनिटांमध्ये ४६ पदार्थ तयार करुन विश्वविक्रम केला आहे. या मुलीच्या विक्रमाची नोंद युनीको ई बूक ऑफ वर्ल्ड डेटामध्ये (UNICO E book of World Data) करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये राहणाऱ्या एस. एन. लक्ष्मी साई श्री असं या मुलीचं नाव आहे.
-
आपल्या आईकडून स्वयंपाक शिकलेल्या लक्ष्मीला हळूहळू स्वयंपाक करण्याची आवड निर्माण झाली. लक्ष्मीने हा विक्रम आपल्या नावावर केल्यानंतर, "मला खूप आनंद झाला आहे की हे मी करु शकले," अशी प्रतिक्रिया दिली आहे.
-
एएनआय या वृत्तसंस्थेने लक्ष्मी साई श्रीने तयार केलेल्या पदार्थांचे फोटोही शेअर केले आहेत. लक्ष्मीची आई एन. एलीमगल यांनी लक्ष्मी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्वयंपाक करायला शिकली, असं म्हटलं आहे. अगदी कमी कालावधीमध्ये लक्ष्मी चविष्ट पदार्थ बनवू लागली. त्याचवेळी लक्ष्मीचे वडिलांनी तिला विश्विक्रम बनवण्याचा सल्ला दिला.
-
लक्ष्मीच्या आईनेच यासंदर्भात माहिती दिली. "मी तामिळनाडूमधील वेगवेगळे पारंपारिक पदार्थ बनवते. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये माझी मुलगी माझ्यासोबत किचनमध्ये मला मदत करायची. जेव्हा मी लक्ष्मीला स्वयंपाकात असणाऱ्या आवडीबद्दल माझ्या पतीशी चर्चा केली तेव्हा त्यांनी आपण लक्ष्मीला स्वयंपाकासंदर्भातील विश्वविक्रम करण्यासंदर्भातील प्रयत्न करण्यासाठी सांगितले पाहिजे असं मत मांडलं," असं एन. एलीमगल यांनी सांगितलं.
-
लक्ष्मीच्या वडिलांनी स्वयंपाकासंदर्भातील विश्वविक्रमाबद्दलची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना केरळमधील सावनी नावाच्या एका १० वर्षीय मुलीने ३० पदार्थ बनवण्याचे संदर्भ सापडले. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीला हा विक्रम मोडण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि लक्ष्मीने हा विक्रम मोडीत काढत ५८ मिनिटांमध्ये ४६ पदार्थ बनवून पालकांचा विश्वास खरा करुन दाखवला. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)
कमाल… लॉकडाउनमध्ये स्वयंपाक शिकली अन् ५८ मिनिटांमध्ये ४६ पदार्थ बनवून विश्वविक्रमाची मानकरी ठरली
तिच्या वडिलांनी तिला विश्वविक्रमासंदर्भातील कल्पना सुचवली
Web Title: Indian girl entered unico book of world records by cooking 46 dishes in 58 minutes scsg