-
२०२० हे वर्ष खरोखरच सर्वांसाठी अविस्मरणीय ठरलं, अर्थात सकारात्कम कमी आणि नकारात्कम अर्थाने जास्त. करोना विषाणूने जगभरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने अनेकांना यंदाच्या वर्षी घरीच बसून रहावं लागलं. हे वर्ष जगभरातील जवळजवळ सर्वांनाच गोड कमी आणि कटू आठवणी फार अशापद्धतीचेच गेलं. बेरोजगारी, आर्थिक संकट, आरोग्य संकट, नैसर्गिक संकटंही अनेकदा आली.
-
मात्र याच लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेकांचा इंटरनेटवरील वेळ वाढला. अनेकजण स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणात वापर करु लागले. मग तो वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा शिक्षणासाठी असो किंवा वेबसिरीज अथवा मनोरंजनासाठी असो इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली हे नक्की. बरं यामध्ये रॅण्डमली काहीही सर्च करणाऱ्यांचं प्रमाणही खूप आहे. गुगलने नुकताच यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली असून त्यांनी भारतीयांनी २०२० मध्ये सर्वाधिक वेळा गुगलला कोणते प्रश्न विचारले याची यादीच तयार केलीय. यामध्ये What and How वरुन प्रामुख्याने प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी आपण काही महत्वाचे सर्वाधिक सर्च झालेले प्रश्न पाहणार आहेत. चला तर पाहूयात यंदा भारतीयांनी गुगलच्या मदतीने कसली उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.
-
What is nepotism? – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल नेटवर्किंगवर हिंदी चित्रपटसृष्टीमधील घराणेशाहीची चर्चा सुरु झाली. मात्र घराणेशाही म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी भारतीयांनी गुगलचीच मदत घेतली.
-
What is hantavirus? – करोनापाठोपाठ चीनमधील अजून एका विषाणूची जगभरात चर्चा झाली ती म्हणजे हंता व्हायरसची. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच चीनमधील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा हंता विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाल्याने या विषाणू नक्की काय आहे हे सर्च करण्यासाठी भारतीयांनी गुगलची मदत घेतल्याचं दिसून येतं.
-
What is NRC? – नागरिकत्व नोंदणी म्हणजे काय यासंदर्भातही अनेकांनी गुगलवर सर्च केल्याचं या गुगल इंडियाच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
-
What is solar eclipse? – यंदा भारतामधूनही अनेक सूर्यग्रहणं दिसली. त्यामुळेच सूर्य ग्रहण म्हणजे काय हे गुगलवर सर्च करणाऱ्या भारतीयांची संख्या इतकी होती की हा सर्वाधिक सर्च झालेल्या प्रश्नांपैकी एक ठरलाय.
-
What is colon infection? – करोनासोबतच आतड्यांना होणारा संसर्ग म्हणजे काय हे शोधण्यासाठीही भारतीयांनी गुगलवर मोठ्याप्रमाणात सर्च केल्याचं दिसून आलं.
-
What is CAA? : मागील वर्षी सर्वाधिक चर्चेत असणारा हा प्रश्न यंदाही सर्वाधिक शोधण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये आहे. सीएए नक्की आहे तरी काय हे शोधणाऱ्यांची संख्या यंदाही कमी झालेली नाही.
-
What is binod? : बिनोद कोण आहे हे अजूनही आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नाहीय. म्हणझे हा कोण किंवा हे काय आहे यासंदर्भातील सर्चही सर्वाधिक शोधण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये आहे यामध्येच या ट्रेण्डचं यश दिसून येत आहे. तुम्हाला ठाऊक आहे ना बिनोद कोण ते?
-
What is coronavirus? : हा प्रश्न या यादीमध्ये आहे यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण आपल्यापैकी प्रत्येकाने करोनाव्हायरस काय आहे हे कधी ना कधी गुगलवर नक्कीच सर्च केलं असणार. हो की नाही?
-
How to make cake at home? : या वर्षी केक झालं नाही असं भारतीय घरं शोधूनही सापडणार नाही असा एक विनोद सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत होता. लॉकडाउनच्या रेसिपिच्या लेटेमध्ये केक हा अग्रस्थानी होती आणि त्यामुळेच तो कसा बननावा यासंदर्भातील गुगल सर्चही आघाडीच्या प्रश्नांपैकी एक आहे.
-
How to make jalebi? – लॉकडाउनमध्ये किचनमधील प्रयोग आणि पौष्टीक खाण्यामध्येही गोड खाणाऱ्यांचे प्रमाण कमी झालं नाही. त्यामुळेच घरच्या घरी जिलेबी कशी बनवावी हे गुगलवर सर्च करणाऱ्यांचं प्रमाणही अधिक असल्याचं गुगलच्या अहवालातून समोर आलं आहे.
-
How to apply e-pass? : करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावमधीमध्ये वेगवेगळ्या झोन्समधून प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य करण्यात आला होता. त्यामुळेच हा ई-पास कसा काढावा यासंदर्भातील सर्चमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं.
-
How to prevent coronavirus? : करोना हा यंदा जगभरात ऑनलाइन ऑफलाइन सगळीकडेच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला त्याप्रमाणे हा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांनी गुगलची मदत घेतली. प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करता येईल हे शोधण्यात भारतीयही आघाडीवर होते.
-
How to recharge Fastag? : भारतामध्ये कुठेही प्रवास करताना टोल देणं अधिक सोयिस्कर व्हावं यासाठी फास्टटॅग योजना राबवण्यात आली. मात्र यामुळे सुरुवातील गोंधळ निर्माण झाला आणि अनेकांनी याबद्दलची उत्तरं शोधण्यासाठी पुन्हा गुगलची मदत घेतली.
-
How to make sanitizer at home? : करोनापाठोपाठ दोन रोजच्या वापरातील झालेले शब्द म्हणजे मास्क आणि सॅनिटायझर. अर्थात जुगाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीयांसाठी सॅनिटायझर हे इतकं महत्वाचं असतं हे यंदा करोनामुळे पहिल्यांदाचं कळलं. सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तूंमध्ये असल्याची घोषणा मार्चच्या दरम्यान करण्यात आली. मात्र अचानक मागणी वाढल्याने सॅनिटायझरच्या किंमती वाढल्याने भारतीयांनी हे घरीच कसं बनवता येईल हे थेट गुगलबाबाला विचारलं. त्यामुळेच हा प्रश्नही सर्वाधिक सर्च केलेल्या प्रश्नांमध्ये आला.
-
What is COVID-19? : करोना विषाणू म्हणजे सार्क-कोव्ही-२ की कोव्हिड १९? हा विषाणू नक्की काय आहे? असे अनेक प्रश्न यंदा भारतीयांनी गुगलला विचारले. करोना विषाणूसंदर्भात गुगल सर्चमध्ये मोठी वाढ दिसून आली.
-
How to link PAN card with Aadhaar card? : लॉकडाउन आणि करोना असला तरी काय झालं? काही गोष्टी कधीच आऊट ऑफ ट्रेण्ड नसतात. त्यापैकी एक म्हणजे ही पॅन कार्ड आणि आधारकार्ड एकमेकांना कसं लिंक करायचं हे जाणून घेण्यासाठी भारतीयांनी गुगलची मदत घेतल्याचं चित्र दिसलं.
-
What is plasma therapy? : जगभरामध्ये करोनावर मात करण्यासाठी औषधे आणि लसीचा शोध सुरु असतानाच प्लाझमा उपचार पद्धती ही करोनावर परिणामकारक असल्याचं दिसून आलं. त्यामुळेच ही पद्धत नक्की काय आहे हे जाणून घेण्यात भारतीयांनी रस दाखवला.
-
How to make dalgona coffee? : लॉकडाउनच्या कालावधीमध्ये घरी बसल्या बसल्या स्वयंपाकघरात अनेक प्रयोग झाले. त्यापैकी सर्वाधिक चर्चा झालेला प्रकार म्हणजे डाल्गोना कॉफी. अर्थात ऑनलाइन ट्रेण्डला फॉलो करत ही कॉफी घरी नक्की कशी बनवता येईल हे जाणून घेण्याबद्दल भारतीय उत्सुक असल्याचं यंदा दिसून आलं असं गुगलचा अहवाल सांगतो.
-
How to increase immunity? : भारतीयांना हा प्रश्न पडण्यामागील कारण म्हणजे करोना. करोनाच्या काळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासंदर्भात भारतीयांनी गुगलची मदत घेतल्याचं दिसत आहे. घरातील कोणते पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतात हे भारतीयांनी गुगलवर शोधलं.
-
How to make paneer? : अर्थात पनीर कसं बनावायचं हा प्रश्न अनेक भारतीयांना या वर्षी पडला याचं मुख्य कारण म्हणजे लॉकडाउन. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये घरच्या घरी पनीर कसं बनावं यासंदर्भात गुगल सर्च करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र यंदा दिसलं.
गुगलबाबा की जय… भारतीयांनी २०२० मध्ये गुगल सर्च केलेले हे प्रश्न पाहून तुम्हीही गोंधळून जाल
जाणून घ्या भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेले यंदाच्या वर्षातील Most Searched Questions कोणते आहेत
Web Title: From dalgona coffee to binod from caa to covid 19 most googled questions of 2020 in india scsg