-
‘गुगल’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांचा आज वाढदिवस… गुगलची मुख्य मातृकंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’च्याही मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कारभार मागील दोन वर्षांपासून संभाळणारे पिचाई आज ४९ वर्षांचे झाले. त्याच निमित्ताने त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…. (सर्व फोटो : वृत्तसंस्था आणि सोशल नेटवर्कींगवरुन साभार)
-
पिचाई हे सध्या गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून अनेक वर्षे त्यांनी हे पद सांभाळले. डिसेंबर २०१९ पासून त्यांनी अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली. पिचाई हे सध्या गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून २०१५ पासून ते या पदावर काम करत आहेत.
-
भारतीय वंशाचे पिचाई हे मूळचे तामिळनाडूतील चेन्नई येथील रहिवासी आहेत. आयआयटी खरगपूरमधून त्यांचे अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर म्हणून ओळख असलेले पिचाई, २००४ पासून गुगलमध्ये कार्यरत आहेत.
-
पिचाई हे अगदी सामन्याप्रमाणे जीवन जगतात. "मला सकाळी लवकर उठायला आवडत नाही," असं त्यांनी स्वत: २०१६ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. सकाळी सातच्या आसपास ते उठतात असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांना सकाळी नाश्त्याला चहा, ऑमलेट आणि टोस्ट केलेला ब्रेड खायला आवडतो.
-
पिचाई यांना सकाळी उठून व्यायाम करायला अजिबात आवडत नाही. मी मॉर्निंग पर्सन नाही असं पिचाई यांनीच म्हटलं होतं. "मी कधीतरी संध्याकाळच्या वेळी व्यायाम करायला जीममध्ये जातो," असं त्यांनी एकदा मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
-
व्यायामाचा आळस असला तरी पिचाई ऑफिसमध्ये खूप चालतात. अनेकदा ते लिफ्ट ऐवजी जिन्यानेच ये-जा करतात. "चालता चालता बराच विचार करता येतो," असं ते सांगतात.
-
जगभरातील लाखो लोक सकाळी गुगलवर बातम्या वाचतात पण स्वत: पिचाई यांना सकाळचे वर्तमानपत्र हातात घेऊन बातम्या वाचायला आवडतं. ते सकाळी 'द वॉल स्ट्रीट जर्नल' वाचतात. तसेच ते 'द न्यूयॉर्क टाइम्स'ची ऑनलाइन अवृत्ती वाचतात.
-
गुगलचा क्रोम ब्राऊझर तयार करण्यामागे पिचाई यांचा मोलाचा वाटा आहे. २००८ मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली गुगल क्रोम ही नवी प्रणाली स्थापन करण्यात आली. क्रोमच्या यशानंतर जीमेल अॅपचेही काम पिचई यांच्याकडे आले.
-
२००८ नंतर पिचाई अँड्रॉइडचे प्रमुख झाले. अँड्रॉइड ही गुगलची मोबाइल फोन संचालन प्रणाली आहे.
-
पिचाई यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. याबद्दल ते अनेकदा उघडपणे बोलले आहेत. काही वर्षांपूर्वी ते भारत दौऱ्यावर आले असताना दिल्लीमधील एका मैदानात क्रिकेटही खेळले होते.
-
पिचाई यांच्या घरी २० ते ३० स्मार्टफोन आहेत. त्यापैकी ते बरेचसे फोन ते टेस्टींगसाठी वापरतात.
-
पिचाई यांनी २००६ साली स्वत:चा पहिला मोबाईल फोन विकत घेतला होता. मात्र त्याआधी त्यांनी १९९५ साली मोटोरोला स्टॅटीक हा फोन विकत घेतलेला.
-
पिचाई हे लहानपणी सांबार आणि पपायसम हे दोन पदार्थ एकत्र करुन खायचे. सांबार तिखट तर पपायसम हे खीरीसारखे गोड असते. "मला गोड पदार्थ आवडत नाहीत," असं त्यांनी २०१६ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
-
पिचाई यांनी अंजली यांच्याशी लग्न केलं आहे. या दोघांची भेट आयआयटी खरगपूरमध्येच झाली. पिचाई यांना ट्विटरने आठ कोटी पगाराची ऑफर दिली होती. त्यावेळी अंजली यांनीच त्यांना गुगलमध्येच राहण्याचा सल्ला दिला होता.
-
सुंदर आणि अंजली या दोघांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव काव्या आणि मुलाचे नाव किरण आहे.
-
पिचाई यांनी २०१६-१७ च्या आर्थिक वर्षामध्ये वर्षी वेतन आणि अन्य रक्कम मिळून तब्बल २०० मिलियन डॉलर (१२.८५ अब्ज रुपये) इतके वेतन मिळाले आहे. सुंदर पिचाई जगातील सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती बनले आहेत.
-
पिचाई यांना २०१५ च्या तुलनेत २०१६ या वर्षी दुप्पट पगार देण्यात आला होता. २०१६ ला पिचाई यांना ६.५ लाख अमेरिकन डॉलर इतके वेतन मिळाले होते.
-
अनेक वर्षांपासून कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या सुंदर पिचाई यांच्याकडे गुगलने ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी सोपवली.
-
२०१६ मध्ये त्यांना १९८.७ मिलियन डॉलर (अंदाजे १२.७७ अब्ज रुपये) मूल्याचे कंपनीचे शेअर्स मिळाले होते. २०१५ च्या तुलनेत ते दुप्पट आहेत. २०१५ मध्ये कंपनीने त्यांना ९९.८ मिलियन अमेरिकन डॉलरचे (अंदाजे ६.४१ अब्ज रुपये) प्रतिबंधित स्टॉक दिले होते.
-
सीएनएनच्या वृत्तानुसार, सुंदर पिचाई यांची सीईओपदावर बढती तसेच अनेक उत्पादने आणि त्यांचे यशस्वी लॉन्चिंग केल्यामुळेच गगुलच्या वेतनवृद्धी समितीने त्यांना जबरदस्त वेतन दिले होते.
-
पिचाई यांच्याकडे गुगलने ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी सोपवल्यापासून प्रमुख जाहिराती आणि यूट्युबच्या माध्यमातून गुगलच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली. तसेच कंपनीने मशीन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्येही मोठी गुंतवणूक केली.
-
पिचाई यांच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये गुगलने नवे स्मार्टफोन, व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट, राउटर आणि व्हाईस कंट्रोल्ड स्मार्ट स्पीकर बाजारात आणले होते. या उत्पादनांतून कंपनीला मोठा फायदा झाला होता.
-
पिचाई यांची ल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बढती झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं होतं, नवीन जबाबदारीबाबत आपल्याला उत्सुकता आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक आव्हानांवर मात करण्यावर आपला भर राहील, लॅरी व सर्जेई यांचा मी आभारी आहे कारण त्यांनी सहकार्य, शोध व व्रतस्थ वृत्तीने काम करण्याची नवी संस्कृती रूजवून कंपनीचा पाया भक्कम केला आहे, असं पिचाई म्हटलं होतं.
-
द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, पिचाई हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एका शक्तिशाली पदावर पोहोचले आहेत. ड्रोन, इंटरनेट बिमिंग बलून, जाहिराती, स्मार्टफोन सॉफ्टवेअर, नकाशे, ऑनलाइन व्हिडिओ या सर्व सेवांची सूत्रे त्यांच्या हातात असतील.
-
अल्फाबेट व गुगल यांना आता दोन वेगवेगळे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष असण्याची गरज नाही. सुंदर पिचाई हे गुगल व अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, असं सांगत पेज व ब्रिन यांनी पिचाई यांची निवड योग्य असल्याचं म्हटलं होतं.
-
पेज व ब्रिन हे अल्फाबेटच्या संचालक मंडळावर कायम आहेत. पेज व ब्रिन यांनी अनेकदा पिचाई यांच्या कामाचे कौतुक केलं आहे.
-
गुगल कंपनीसमोर सध्या मोठा आकार, माहितीची सुरक्षितता व समाजावर परिणाम या मुद्दय़ांवर अनेक आव्हाने असताना पिचाई यांनी अल्फाबेटची सुत्रं हाती घेतली. अल्फाबेट ही कंपनी चांगली प्रस्थापित झालेली असून ‘गुगल’ व ‘अदर बेटस’या दोन कंपन्याही चांगले काम करीत आहेत. त्यामुळे व्यवस्थापन रचना अधिक सुलभ करण्याची गरज आहे.
-
पिचाई यांचा सध्याचा वार्षिक पगार हा २० लाख अमेरिकन डॉलर इतका आहे. म्हणजेच भारतीय चलनामध्ये १४ कोटी ५० लाखांहून अधिक.
-
याशिवाय पिचाई कंपनीमध्ये शेअर्स असून त्यामधूनही त्यांना पैसे मिळतात. मागील दहा वर्षांपासून त्यांना कंपनीतील शेअर्समधून पैसे मिळत असल्याचं द व्हर्जने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
-
अगदी थोड्यात सांगायचं झाल्यास केवळ वेतन म्हणून आज पिचाई यांना महिन्याला १ कोटी रुपये मिळतात.
Sundar Pichai Birthday : चहाप्रेम, क्रिकेटचं वेड, व्यायामाचा आळस अन्… Typical भारतीय आहेत Google चे CEO
‘गुगल’ चे सीईओ सुंदर पिचाई यांचा आज वाढदिवस असून कायम त्यांच्या पगाराबद्दलचीच चर्चा ऐकू येते, मात्र आज त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टींबद्दल…
Web Title: Sundar pichai birthday interesting facts salary income lifestyle scsg