-
दक्षिण अमेरिकेतील चिली देशात एक विचित्र प्रकार समोर आला असून यामुळे वैज्ञानिक आणि संशोधकही बुचकाळ्यात पडले आहेत. येथील एका भागामध्ये अचानक एक फार मोठ्या आकाराचा खड्डा पडला असून या खड्ड्यासंदर्भातील गूढ अद्याप कायम आहे.
-
सध्या या खड्ड्यांचा आकार हा २५ मीटर रुंद आणि २०० मीटर खोल इतका असून तो उत्तर चिलीमधील तिईरा अमरिला भागामध्ये अचानक एका रात्रीत निर्माण झालाय. धक्कादायक बाब म्हणजे या खड्ड्याचा आकार दिवसोंदिवस वाढत असून हवेतून करण्यात आलेल्या चित्रकरणामध्ये या खड्ड्याचा व्यास हा ८२ फूटांहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
-
चिलीमधील राष्ट्रीय स्तरावर माती परिक्षण आणि अभ्यास करणाऱ्या संस्थेकडून या खड्ड्याचा अभ्यास केला जात आहे. मागील आठवड्याभरापासून हा अभ्यास सुरु आहे. कॅनडामधील लुडीन मायनिंग नावाच्या कंपनीची तांब्याचं उत्खनन करणारी खाण या खड्ड्यापासून काही किलोमीटरच्या अंतरारवर आहे.
-
या खड्ड्यामध्ये आम्हाला कोणतीही वस्तू आढळून आली नाही. मात्र खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी आहे, असं खाणकामासंदर्भात काम करणाऱ्या चिलीच्या राष्ट्रीय संस्थेचे निर्देशक डेव्हीड मेंटेग्रो यांनी सांगितलं.
-
या खड्ड्याचा खाणींशी कोणताही संबंध नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने जारी केलेल्या पत्रकामध्ये या खड्ड्यामुळे कोणत्याही खाणीला किंवा व्यक्तीला धोका निर्माण झालेला नाही असं म्हटलंय. ज्या ठिकाणी खड्डा पडला आहे तिथून सर्वात जवळचं घर हे ६०० मीटर अंतरावर असून या खड्ड्याच्या आजूबाजूला कोणतीही सार्वजनिक व्यवस्था नसल्याने त्यावरही परिणाम झालेला नाहीय, असं कंपनीने म्हटलंय.
-
स्थानिक महापौरांनी या खड्ड्याबद्दल चिंता व्यक्त केल्याचं रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या खड्ड्याचा सध्या जरी काही त्रास नसला तरी त्याचा आकार वाढत असून यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यापूर्वी आमच्या शहरामध्ये असा प्रकार कधीही घडला नव्हता, असं महापौर ख्रिस्तोफर झुनिगा यांनी म्हटलं आहे. (सर्व फोटो रॉयटर्सवरुन साभार)
Photos: अचानक ‘या’ देशात पडला भला मोठा खड्डा; दिवसोंदिवस आकार वाढणाऱ्या खड्ड्याचं गूढ कायम, स्थानिक भीतीच्या छायेत
सध्या या खड्ड्याचा आकार हा २५ मीटर रुंद आणि २०० मीटर खोल इतका असून एका रात्रीत तो तयार झाल्यासं सांगण्यात येत आहे.
Web Title: Mysterious massive sinkhole in chile ranks among deepest scsg