छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यात गाेपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागर, बदामराव पंडित-अमरसिंह पंडित या काका-पुतण्यातील राजकीय संघर्षाचा इतिहास आहे. या संघर्षातून काका-पुतण्यातील राजकीय वाटा वेगवेगळ्या पक्षात जाऊन स्थिरावल्या असून कौटुंबिक स्तरावरील नात्यांमध्ये दरी वाढत गेली आहे. राजकीय महत्त्वकांक्षेतून अशा प्रकारचा संघर्ष कुटुंबातही निर्माण हाेण्याच्या शक्यतेचा अंदाज बांधूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साेळंके यांनी दाेन्ही मुलांऐवजी पुतणे जयसिंह साेळंके यांच्यासाठी राजकीय मैदान खुले केले आहे.
माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश साेळंके यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ते सध्या मतदारसंघातील दाैऱ्यांमध्ये पुतणे जयसिंह साेळंके यांचे नाव आपले राजकीय वारसदार म्हणून पुढे करत आहेत. मात्र, त्यांच्या या भूमिकेकडे राजकीय चाल म्हणून बघितले जात आहे. पुतण्यासाेबतचा कुटुंबातील संभाव्य संघर्ष, मतदारसंघात युवापिढीतील मराठा तरुणांमध्ये लाेकसभेसाठी पंकजा मुंडे यांच्यासाठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून केलेल्या कामामुळे निर्माण झालेली नाराजी पाहूनच साेळंके यांनी वय-प्रकृतीचे कारण देत राजकीय मैदानातून माघार घेतल्याची शक्यता आहे. पुतण्यासाठी राजकीय मैदान खुले करणारे प्रकाश साेळंके हे बीडमधील अलिकडच्या काळातील पहिले काका ठरले आहेत.
प्रकाश साेळंके यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पुतणे जयसिंह साेळंके यांना पुढे आणले. मुले राजकारणात उतरण्यास अनुत्सुक असल्याचे दिसताच त्यांनी एका सुनेला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून कुटुंबातूनच संघर्ष उभा ठाकण्याची चिन्हे दिसू लागली.
हेही वाचा – शेकाप प्रमुखांच्या कुटुंबात उमेदवारीवरून कलह, दोन भावांमध्ये बाचाबाची
मराठा आरक्षण आंदाेलनाच्या धगीत प्रकाश साेळंके यांचे घर पेटवण्यात आले हाेते. आरक्षणाच्या वातावरणात मराठा समाजातील तरुणांमध्ये तीव्र नाराजी पसरली हाेती. मात्र, त्यानंतरही त्यांनी लाेकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना ९४७ च्या आसपासचे मताधिक्य दिले हाेते. त्याचे परिणाम कदाचित विधानसभा निवडणुकीत दिसण्याचा आणि प्रतिस्पर्धी पक्षाकडून एखादा नवा तरुण चेहरा उमेदवारीत उतरवला तर राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याचा अंदाज ओळखून साेळंके यांनी घरातील तरुण नेतृत्त्वच पुढे केले आहे. ओबीसी समुदायाचेही पाठबळ राहील याचा विचार ठेवलेला दिसतो आहे. जोडीला जयसिंह साेळंके यांचे युवापिढीतील काम, संघटन असून ते गुण पाहता त्यांनाच राजकीय वारसदार करण्याची राजकीय चाल पुढे केल्याचे दिसत आहे.
हेही वाचा – नाशिकमध्ये परस्पर उमेदवारी जाहीर करण्याच्या स्पर्धेने महायुती, महाविकास आघाडीत वितुष्ट
जयसिंह हे पंचायत समितीच्या राजकारणातून पुढे आले. धारूर पंचायत समितीचे उपसभापती झाले. नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून ते बांधकाम सभापती झाले. काकांचा मतदारसंघ सांभाळताना संपर्काची जबाबदारी स्वतः पेलली. युवा पिढीचे प्रामुख्याने संघटन मजबूत केले. त्यांचे वडील धैर्यशील साेळंकेही जिल्हा परिषद सभापती राहिलेले. आजाेबा सुंदरराव साेळंके हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. मतदारसंघात साखर कारखाना, गुळ पावडर कारखाना, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळचे केंद्रीय सदस्य म्हणून काम करताना जयसिंह साेळंके यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी करून ठेवलेली आहे.
© The Indian Express (P) Ltd