संजीव कुळकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेड : पश्चिम महाराष्ट्रातल्या सीमावर्ती गावांना चुचकारण्याचे उद्योग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दीड महिन्यांपूर्वी केल्यानंतर तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या काही भागात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या लोकप्रतिनिधींनी संवाद संपर्क वाढविला आहे. त्याचाच पुढील भाग म्हणून चंद्रशेखर राव हे पक्ष विस्तारण्याकरिता लवकरच नांदेडमध्ये येणार आहेत.

२०१४ साली तेलंगणा राष्ट्र समितीने नव्या तेलंगणा राज्याची सत्ता हस्तगत केल्यानंतर आठ वर्षे हा पक्ष प्रादेशिक पातळीवर होता. पण अलीकडेच या पक्षाचे ‘भारत राष्ट्र समिती (बीआरएस)’ असे नामकरण झाल्यानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत ‘बीआरएस’च्या पक्षविस्ताराची मोहीम नांदेडमधून सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते.

हेही वाचा… “तुम्ही एकाचवेळी सावरकर आणि नेताजींच्या…”, सुभाषचंद्र बोस यांच्या नातूचं मोहन भागवंतांना प्रत्युत्तर

तेलंगणातील राज्यकारभार चालविणाऱ्या के.चंद्रशेखर राव यांनी ‘उज्ज्वल भारत’चा नारा यापूर्वीच दिलेला आहे. मधल्या काळात कर्नाटकच्या सीमेवरच्या महाराष्ट्रातील काही गावांनी त्या राज्यात जाण्याचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय पातळीवर खूप चर्चा झाली. तो वाद केंद्रीय गृहमंत्र्यांनी शमविला; पण इकडे नांदेड जिल्ह्याच्या किनवट, बिलोली, धर्माबाद, देगलूर, मुखेड आदी तालुक्यांमध्ये ‘बीआरएस’च्या लोकप्रतिनिधींनी संपर्क आणि संवाद वाढविल्याचे दिसून आले. के.चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा १५ जानेवारीला ठरविण्यात आली होती. पण मराठवाड्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे ही सभा पुढे ढकलावी लागली. ती आता फेब्रुवारीच्या सुरुवातीला होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा… सत्यजित तांबे यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश?

बीआरएसच्या काही लोकप्रतिनिधींसह प्रमुख नेत्यांनी गेल्या महिन्यात किनवट तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांना भेटी देत प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर बिलोली तालुक्यातही अशा काही भेटीगाठी झाल्याचे सांगितले जात आहे. नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील काही मराठी कार्यकर्ते बीआरएस नेत्यांच्या नित्य संपर्कात आहेत. गेल्या रविवारी बिलोली येथे एक बैठकही झाली. त्या बैठकीनंतर के.चंद्रशेखर राव यांच्या नियोजित नांदेड दौऱ्याची चर्चा समोर आली.

तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय राजकारणात उतरण्यापूर्वी के. चंद्रशेखर राव यांनी एक आराखडा तयार केला असून त्यानुसार देशातील सहा लाख गावांमध्ये बीआरएसचे जाळे पसरविण्याचा मनोदय त्यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. पक्षाच्या विस्ताराची सुरुवात महाराष्ट्रातील नांदेडमधून केली जाणार असल्याचे राव यांनी जाहीर केले होते. येथे मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या नियोजित सभेची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. नांदेडची सभा घेण्यापूर्वी ते सचखंड गुरूद्वारात दर्शन घेणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K chandrasekhar rao now planning expansion of bharat rashtra samiti in maharashtra print politics news asj