नाशिक – सिंहस्थ कुंभमेळा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यावर आपलाच प्रभाव राहील, याची पुरेपूर खबरदारी भाजपकडून घेतली जात आहे. त्यासाठी महायुतीत वादाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा विषयही पूर्णत: बाजुला ठेवत भाजपने कुंभमेळ्याचे नियोजन पुढे नेण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात ते अधोरेखित झाले.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा पेच पाच-सहा महिन्यांपासून सुटलेला नाही. अलीकडेच छगन भुजबळ हे मंत्री झाल्यानंतर सर्वाधिक सात आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीने (अजित पवार) पुन्हा या पदावर दावा सांगण्यास सुरुवात केली. यापूर्वी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती. परंतु, शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) विरोधामुळे त्यास स्थगिती द्यावी लागली. जिल्ह्यात दोन आमदार असणाऱ्या शिंदे गटाला हे पद हवे आहे. महायुतीतील कुणीही माघार घेत नसल्याने हा विषय रखडलेला आहे. या परिस्थितीचा कुंभमेळा नियोजनावर परिणाम होऊ नये, अशी तयारी भाजपने केली आहे. मागील कुंभमेळ्यात नियोजन, अंमलबजावणी, देशभरातील साधू-महंत व भाविकांचे आदरातिथ्य यावर भाजपचे एकहाती वर्चस्व होते. यशस्वी नियोजनाचे राजकीय लाभ होतात. त्यामुळे आगामी कुंभमेळ्यात त्याची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
कुंभमेळ्यासाठी स्थापन केलेल्या शिखर समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. भाजपचे संकटमोचक अशी प्रतिमा तयार झालेले गिरीश महाजन यांच्यावर कुंभमेळ्याची जबाबदारी सोपविली गेली आहे. उभयतांकडून तयारीला वेग दिला जात आहे. यातून नाशिकला पालकमंत्री असला किंवा नसला तरी काहीही फरक पडत नसल्याचा संदेश दिला गेला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात साधू-महंतांशी प्रथमच बैठकीतून संवाद साधला गेला. महत्वाची बाब म्हणजे त्र्यंबकेश्वरमधील शैवपंथीय आणि नाशिकमधील वैष्णवपंथीय महंत आपसातील मतभेद बाजुला ठेवून यात सहभागी झाले होते. शासकीय आणि प्रशासकीय आदरातिथ्याने ते तृप्त झाले.
मागील दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकचा पालकमंत्री निश्चित होत नाही, तोपर्यंत मीच पालकमंत्री असल्याचे म्हटले होते. यावेळी कुंभमेळ्यातील मुख्य पर्वण्यांचे मुहूर्त निश्चित झाले. पालकमंत्रीपदाला मुहूर्त कधी लाभणार, या प्रश्नावर त्यांनी पालकमंत्री येतात, जातात. त्यांचा काय संबंध, नाशिकला पालकमंत्री नसल्यामुळे काही अडले आहे का, असा प्रश्न केला. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन काम पाहत आहेत. दादा भुसे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ आदी मंत्री बरोबर आहेत. काही कमी पडल्यास आम्ही आहोत. कोणीही काळजी करू नये. सिंहस्थ कुंभमेळा हे आपले धार्मिक व सांस्कृतिक पर्व आहे. यामध्ये राजकारण आणू नका, असा सूचक संदेश त्यांनी सर्वांनाच दिल्याचे मानले जाते.