ठाणे : पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ७२ हजारांच्या आसपास मते घेणारे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांची यंदाच्या प्रचारात जोरदार हवा निर्माण केली होती. असे असले तरी निकालात त्यांची पीछेहाट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना कमी मिळालेली मते आणि दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेल्याने जाधव यांची केवळ प्रचारातच हवा होती, असे आता निकालातून स्पष्ट होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर, ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात तिरंगी लढत होती. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय केळकर विरुद्ध अविनाश जाधव असा सामना झाला होता. या निवडणुकीत केळकर १९ हजार मतांनी विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीतही केळकर व जाधव हे दोन्ही उमेदवार रिंगणात होते. त्यातच या मतदारसंघातून २००९ मध्ये आमदार राहिलेले ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या तिरंगी लढतीमुळे निवडणुकीची रंगत वाढली होती. अविनाश जाधव यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार केला होता. ठाणे स्थानकात फलक हातात घेऊन त्यांनी प्रचार केला होता आणि एकदा निवडून देण्याची संधी मागितली होती. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा झाल्या. शर्मिला ठाकरे यांनी चौक सभा घेतल्या होत्या. एकूणच प्रचारातील वातावरण निर्मितीमुळे मनसेची प्रचारात हवा दिसून येत होती. जाधव हेच बाजी मारतील आणि पराभूत झाले तर विचारे यांच्यापेक्षा जास्त मते घेतील अशा चर्चा रंगल्या होत्या. प्रत्यक्षात निकालानंतर मनसेची प्रचारात केवळ हवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांवरील व्यक्तिगत टीका कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांना भोवली? मोरे पाहुणे म्हणून आले आणि वतनदार बनले

जाधव यांना कमी मते

या निवडणुकीत संजय केळकर हे ५८ हजार २५३ इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गेल्या निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ७२ हजारांच्या आसपास मते अविनाश जाधव यांनी घेतली होती. परंतु या निवडणुकीत मागच्या वेळीपेक्षा कमी म्हणजेच ४२ हजार मते जाधव यांना मिळाली असून त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजेच ६२ हजार मते राजन विचारे यांना मिळाली आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 thane city mns candidate avinash jadhav wave in campaigning print politics news zws