ऑपरेशन सिंदूरनंतरच्या पहिल्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर अचूक हल्ले केल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले. या मोहिमेच्या यशाचे श्रेय त्यांनी भारतात विकसित केलेल्या म्हणजेच मेड-इन-इंडिया शस्त्रांच्या सामर्थ्याला दिले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या सैनिकांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. ते सैनिकांचे अदम्य धैर्य होते. तसेच भारतात तयार करण्यात आलेली शस्त्रे, उपकरणे आणि तंत्रज्ञानाची शक्ती होती,” असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “त्यात आत्मनिर्भर भारताचा संकल्पदेखील समाविष्ट होता.” त्यांनी पुढे सांगितले की, भारतीयांमध्ये मुलांसाठी भारतात तयार होणारी खेळणी खरेदी करण्याची, लग्नांचे नियोजन करण्याची आणि स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या भेटवस्तू खरेदी करण्याची भावना वाढत आहे.

त्यांनी या कार्यक्रमात स्वदेशी वस्तूंचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. ते पुढे, “मित्रांनो, हीच भारताची खरी ताकद आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. चला, या प्रसंगी आपण एक प्रतिज्ञा करूया. आपल्या जीवनात जिथे शक्य असेल, तिथे आपण देशात तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना प्राधान्य देऊया. ही केवळ आर्थिक स्वावलंबनाची बाब नसून, राष्ट्रउभारणीतील सहभागाची भावना आहे. आपले एक पाऊल भारताच्या प्रगतीत मोठे योगदान देऊ शकते,” असे म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरचे कौतुक

७ मे रोजी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवीत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले होते. पंतप्रधान मोदींच्या मते या ऑपरेशनमुळे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नवीन आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण झाला आहे. मोदींनी भारतीय सैन्याने सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांना नष्ट केल्याबद्दल आणि त्यांच्या अचूकतेबद्दलही कौतुक केले. ते म्हणाले, “आपल्या सैन्याने ज्या अचूकतेने सीमेपलीकडे असलेले दहशतवादी तळ नष्ट केले, ते आश्चर्यकारक आहे. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नसून, ते आपल्या दृढनिश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र आहे आणि या चित्राने संपूर्ण देशात देशभक्तीची भावना जागृत केली आहे.” ते पुढे म्हणाले, “तुम्ही पाहिले असेलच की, देशातील अनेक शहरे, गावे आणि लहान शहरांमध्ये तिरंगा यात्रा आयोजित केल्या जात होत्या. संपूर्ण देशात दहशतवादाविरुद्ध एकजूट झाली आहे आणि देशाने दहशतवाद संपवण्याचा संकल्प केला आहे.”

पंतप्रधानांनी माओवाद्यांच्या हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या जिल्ह्यांमधील सुधारणांचाही उल्लेख केला. त्यात गडचिरोलीतील एका गावाचा समावेश आहे, जिथे पहिल्यांदाच बस सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान म्हणाले, “माओवादाच्या विरोधात सामूहिक लढाईमुळे अशा भागात मूलभूत सुविधादेखील पोहोचू लागल्या आहेत. गावातील लोक म्हणतात की, बस सेवा सुरू झाल्याने त्यांचे जीवन खूप सोपे होणार आहे.”