Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरिशसच्या दौऱ्यावर गेले आहेत. मॉरिशसमध्ये त्यांचं स्वागत झाल्याचंही त्यांनी पोस्ट करत म्हटलं आहे. दरम्यान नरेंद्र मोदींच्या १९९८ च्या मॉरिशस भेटीचे फोटो सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत. नरेंद्र मोदी हे तेव्हा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. त्यावेळी त्यांनी मॉरिशसचा दौरा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९८ चे नरेंद्र मोदींचे मॉरिशसचे फोटो व्हायरल

मॉरीशसला ‘मिनी इंडिया’ असं म्हटलं जातं. मॉरीशस आणि भारताचे खास आणि जुने संबंध आहेत. नरेंद्र मोदी हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असताना १९९८ मध्ये पहिल्यांदाच मॉरिशस दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Modi Archive या एक्स पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यानंतर ते व्हायरल झाले आहेत. एक शतकापूर्वी आपले पूर्वज, मजूर म्हणून मॉरिशसमध्ये आले होते. ते आपल्याबरोबर तुलसीदास यांचे रामायण, हनुमान चालीसा आणि हिंदी भाषा घेऊन गेले होते, असाही उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. २७ वर्षांपूर्वीचे हे फोटो आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

नरेंद्र मोदींचा पहिला मॉरीशस दौरा कशासाठी?

नरेंद्र मोदी १९९८ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. २ ते ८ ऑक्टोबर १९९९ या कालावधीत नरेंद्र मोदी जागतिक रामायण संमेलनासाठी मॉरिशसला गेले होते. प्रभू रामचंद्रांचा आदर्श, त्यांची जीवनमूल्ये यावर त्यांनी आपल्या भाषणांतून प्रकाश टाकला होता. रामायण हा एक धार्मिक ग्रंथच नाही तर भारत आणि मॉरिशसला जोडणाऱ्या संस्कृतीचा एक सेतू आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले होते. आज पंतप्रधान पदावर असताना जेव्हा नरेंद्र मोदी मॉरिशसला गेले आहेत तेव्हा हे फोटो व्हायरल झाले आहेत. रामायणामुळे भारत आणि मॉरिशस यांच्यातले शाश्वत संबंध कसे टिकून आहेत याबाबतही त्यावेळी मोदी यांनी भाष्य केलं होतं.

नरेंद्र मोदींचा पहिला मॉरिशस दौरा चांगलाच यशस्वी ठरला

नरेंद्र मोदी यांचा पहिला मॉरिशस दौरा चांगलाच यशस्वी झाला. मोदी यांनी त्यावेळच्या दौऱ्यात स्थानिक नेते, लोक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मॉरिशसचे राष्ट्रपती असलेल्या कासम उतीम आणि पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी त्यांची चांगली मैत्री झाली. हे फोटो आता पुन्हा व्हायरल झाले आहेत.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पुन्हा मॉरिशस दौऱ्यावर

नरेंद्र मोदींनी त्यावेळी मॉरिशसची संस्कृती, इतिहास याबाबतही भाष्य केलं होतं. तसंच मॉरिशसचा स्वातंत्र्य लढा कसा होता हे देखील समजून घेतलं होतं. भारताचा स्वातंत्र्य लढा आणि मॉरिशसचा स्वातंत्र्य लढा यातील साम्य स्थळांवरही त्यांनी तिथल्या नेत्यांशी चर्चा केली होती. तसंच प्रसिद्ध गंगा तलावाचाही दौरा केला होता. या ठिकाणी आजही भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळतात असंही त्यावेळी मोदी म्हणाले होते. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मॉरिशस दौऱ्यावर आहेत. १२ मार्च हा तिथला राष्ट्रीय दिवस असतो. या दिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशस दौऱ्यावर आहेत.

२०१५ मध्येही मोदींचा मॉरिशस दौरा

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्येही मॉरिशसचा दौरा केला होता. त्यावेळीही त्यांनी मॉरिशसच्या गंगा तलावाला भेट दिली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंब्याच्या झाडाचं उदाहरण दिलं होतं. “आपण आंब्याची विविध झाडं पाहतो तेव्हा त्यातले सगळे आंबे खाऊन बघत नाही. एक किंवा दोन आंबे खाल्ले की आपल्याला समजतं की संपूर्ण झाडांना लगडलेले आंबे कसे आहेत. त्याचप्रमाणे जगाने मॉरिशसकडे पाहिलं की त्यांना भारत काय आहे हे समजू शकतंय” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. आता त्यांचे १९९८ च्या मॉरिशस दौऱ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi visited mauritius in 1998 photos viral on social media scj