पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये आयोजित जी-७ शिखर परिषदेत सहभागी झाले. त्यांनी या परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या वस्तू भेट स्वरूपात दिल्या. यात भारताच्या विविध राज्यांतील हस्तकला आणि भारतातील लोककलेचे दर्शन घडवणाऱ्या भेटवस्तूंचा समावेश होता. या भेटवस्तूंची आता मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदींनी कोणत्या नेत्याला काय भेटवस्तू दिली, त्याविषयी जाणून घेऊयात.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी
पंतप्रधान मोदींनी कॅनडातील जी-७ शिखर परिषदेदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना हस्तनिर्मित पितळेचा बोधीवृक्ष भेट दिला. हा वृक्ष बिहारमधील पवित्र बोधिवृक्षाचे प्रतीक आहे, जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. हा वृक्ष ज्ञान, शांती आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
पंतप्रधान मोदींकडून इमॅन्युएल मॅक्रॉन यांना तामिळनाडूतील हस्तनिर्मित डोकरा नंदी शिल्प भेट म्हणून देण्यात आले. हे शिल्प लुप्त झालेल्या प्राचीन मेणाच्या तंत्राचा वापर करून तयार करण्यात आले आहे. या शिल्पात गुंतागुंतीचे जाळीकाम करण्यात आले आहे आणि यात पारंपरिक भारतीय धातूची कलात्मकता दर्शवणारी चमकदार लाल काठी आहे.
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम पारडो
मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम पारडो यांना पंतप्रधान मोदींनी पारंपरिक वारली चित्र भेट दिले. महाराष्ट्रातील वारली ही कला मातीवर पांढऱ्या तांदळाच्या पेस्टचा वापर करून तयार केली जाते. त्यात दैनंदिन ग्रामीण जीवनाचे चित्रण केले जाते, ज्यामध्ये शेती, नृत्य आणि उत्सव यांसारख्या चित्रांचा समावेश असतो. हे चित्र समुदाय आणि जुन्या परंपरेचे प्रतीक आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांना पारंपरिक मधुबनी चित्र भेट दिले. भारतातील बिहार मधील मधुबनी लोककला ठळक रूपरेषा आणि निसर्ग, पौराणिक कथा आणि सांस्कृतिक कथा दर्शविणाऱ्या डिझाइनसाठी ओळखली जाते. पारंपरिकपणे महिला नैसर्गिक रंगांचा वापर करून ही कलाकृती तयार करतात. ही पर्यावरणपूरक कलाकृती भिंतीवरील चित्रांपासून आता कॅनव्हासपर्यंत विकसित झाली आहे आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा
पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना छत्तीसगडमधील हस्तनिर्मित पितळीचा डोक्रा घोडा भेट दिला आहे. आदिवासी कारागिरांनी प्राचीन मेणाच्या कास्टिंग तंत्राचा वापर करून हे शिल्प तयार केले आहे. हे शिल्प शक्ती, निष्ठा आणि भक्तीचे प्रतीक आहे.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इन्सियो लुला दा सिल्वा
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष लुईझ इन्सियो लुला दा सिल्वा यांना हस्तनिर्मित छडी आणि बांबूची बोट भेट दिली. मेघालयातील ही पर्यावरणपूरक कलाकृती या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक कारागिरीचे प्रतीक आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज
पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना कोल्हापुरी चांदीचे भांडे भेट दिले. हे भांडे शुद्ध चांदीपासून तयार करण्यात आले आहे. त्यावर गुंतागुंतीची हातानी कोरलेली फुलांची आणि पैसली डिझाइन आहे. महाराष्ट्रातील हे पारंपरिक भांडे सौंदर्य आणि औपचारिक वारशाचे प्रतीक आहे.
जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ
पंतप्रधानांनी शिखर परिषदेदरम्यान जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ यांना कोणार्क चाकाची वाळुच्या दगडाची प्रतिकृती भेट दिली आहे. ओडिशातील या कलाकृतीत गुंतागुंतीचे कोरीव काम आहे. ही कलाकृती १३ व्या शतकातील सूर्य मंदिराच्या प्रतिमेचे प्रतीक आहे. हे मंदिर काळ आणि विश्वाचे प्रतीक आहे.
कॅनडाच्या गव्हर्नर जनरल मेरी सायमन
पंतप्रधानांनी कॅनडाच्या गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांना चांदीची फिलीग्री क्लच पर्स भेट दिली. ओडिशाच्या कटक येथील हस्तकलेचा हा उत्कृष्ट नमुना ५०० वर्ष जुनी तारकासी कलाकृतीचे प्रतीक आहे. त्यावर बारीक चांदीच्या तारांपासून तयार करण्यात आलेले नाजूक डिझाइन आहे.
अल्बर्टाच्या पंतप्रधान डॅनियल स्मिथ
पंतप्रधान मोदींनी अल्बर्टाच्या पंतप्रधान डॅनियल स्मिथ यांना लाकडाच्या जाळीकाम व चांदीची नक्षी असलेला एक सुंदर वर्क बॉक्स भेट दिला. राजस्थानमध्ये तयार करण्यात आलेल्या या बॉक्सवर हाताने कोरलेले जाळीकाम आणि झाकणावर हाताने रंगवलेला मोर आहे. ही कला शतकानुशतके जुन्या पारंपरिक कारागिरीचे प्रतीक आहे.
अल्बर्टाच्या लेफ्टनंट गव्हर्नर सलमा लखानी
पंतप्रधानांनी अल्बर्टाच्या लेफ्टनंट गव्हर्नर सलमा लखानी यांना सोन्याच्या पानांचे काम असलेला एक पेपर-मॅक बॉक्स भेट दिला. जम्मू आणि काश्मीरमधील हा सजावटीचा बॉक्स या प्रदेशाच्या समृद्ध कलात्मकतेचे प्रतीक आहे, त्यामध्ये हाताने रंगवलेली फुले आणि नैसर्गिक चित्रे आहेत, तसेच त्यात नाजूक सोनेरी रंगांचा समावेश आहे. हा बॉक्स काश्मीरच्या पारंपरिक कलाकुसरीचा नमुना आहे.