X
X

हॉर्न वाजवणारा १६ मिनिटे.. न वाजवणारा १९ मिनिटे

READ IN APP

या प्रयोगात दोन दुचाकीस्वार आणि दोन मोटारचालक सहभागी झाले होते.

हॉर्न न वाजवताही दुचाकीस्वाराला इच्छितस्थळी पोहोचण्यास अधिक विलंब नाही; वाहतूक पोलिसांचे निरीक्षण

कोंढव्यातील खडी मशीन चौक ते लष्कर भागातील डॉ. आंबेडकर पुतळा चौक दरम्यानचे अंतर सातत्याने हॉर्न वाजवत जाणारा दुचाकीस्वार १६ मिनिटे ९ सेकंदात पोहोचला. तर हॉर्न न वाजविणाऱ्या दुचाकीस्वाराला हेच अंतर जायला १९ मिनिटे ४३ सेकंद लागली. त्यामुळे सातत्याने हॉर्न वाजवूनही विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेत फारसा फरक पडत नसल्याचे निरीक्षण वाहतूक पोलिसांकडून नोंदविण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांकडून कोंढवा खडी मशीन चौक ते लष्कर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक दरम्यान मंगळवारी एक प्रयोग राबविण्यात आला. या प्रयोगात दोन दुचाकीस्वार आणि दोन मोटारचालक सहभागी झाले होते. त्यापैकी एक दुचाकीस्वार आणि मोटाराचालकाला हॉर्न वाजवत खडी मशीन चौक ते डॉ. आंबेडकर पुतळा अंतर कापण्याची सूचना पोलिसांनी दिली, तसेच अन्य एक दुचाकीस्वार आणि मोटारचालकाला हॉर्न न वाजवता हे अंतर कापण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार हॉर्न वाजवत निघालेला दुचाकीस्वार १६ मिनिटे ९ सेकंदात तेथे पोहोचला आणि हॉर्न न वाजविणाऱ्या दुचाकीस्वाराने हे अंतर १९. ४३ मिनिटात कापले. हॉर्न वाजवत निघालेला मोटारचालक २० मिनिटांत पोहोचला आणि हॉर्न न वाजवणारा मोटारचालक २५ मिनिटांत पोहोचला, असे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदवले.

हॉर्न वाजविणारा दुचाकीस्वार तीन मिनिटे आणि मोटारचालक पाच मिनिटे अगोदर पोहोचले. सातत्याने हॉर्न वाजवण्यात आल्याने ध्वनिप्रदूषण झाले. त्या उलट हॉर्न न वाजवता विशिष्ट अंतर कापणारा दुचाकीस्वार आणि मोटारचालकाला फक्त काही मिनिटांचा उशीर झाला. काही वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवत असल्याने ध्वनिप्रदूषणात वाढ होत असल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. सातपुतेंच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी हा प्रयोग राबविला.

आज ‘नो हॉर्न डे!’

प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून बुधवारी (१२ सप्टेंबर) नो हॉर्न डे उपक्रम राबविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी विनाकारण हॉर्न वाजवू नये तसेच ध्वनिप्रदूषण करू  नये, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहनचालकांनी नो हॉर्न डे उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

22
X