प्रतिसाद वाढतोय; नियोजनशून्य कारभार तसाच
पिंपरी महापालिकेच्या १९व्या स्वरसागर संगीत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा तसेच समारोप थाटामाटात पार पडला. नेहमीच्या जागेत बदल झाल्याने नव्या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळेल, याविषयी साशंकता होती, मात्र रसिकांनी मोठी गर्दी केल्याने संयोजकांचा जीव भांडय़ात पडला. नियोजनातील नेहमीच्या त्रुटी मात्र कायम राहिल्या. वेळ ही पाळण्यासाठी नसतेच, याचा पुन:प्रत्यय संयोजकांनी कृतीतून दिला. राजकीय हस्तक्षेप आणि संयोजनातील अधिकारी यामुळे महोत्सवाच्या मूळ हेतूला हरताळ फासला जातो की काय, अशी शंका येऊ शकते.
स्वरसागर संगीत महोत्सव गेल्या काही वर्षांपासून चिंचवड-संभाजीनगरच्या साई उद्यानात होत होता. या वर्षी पूर्णानगर येथील मैदानात तो स्थलांतरित करण्यात आला. याचे कारण, महापालिकेमध्ये सत्तांतर झाले. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात तत्कालीन पक्षनेत्या मंगला कदम यांच्या प्रभागात होणाऱ्या महोत्सवावर त्यांचेच नियंत्रण आणि छाप होती. तोच कित्ता सध्याचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी गिरवला आहे. अट्टाहासाने त्यांनी हा महोत्सव स्वत:च्या प्रभागात नेला आणि संपूर्ण महोत्सवात स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतली. या वर्षी स्वरसागरला उत्तम प्रतिसाद मिळाला, मात्र नियोजनशून्य कारभार तसाच राहिल्याचे दिसून आले.
उद्घाटनाच्या दिवशी दोन मोठे कार्यक्रम घेण्यात आले. मुख्य सोहळय़ापूर्वी नंदेश उमप यांच्या ‘लोकरंग’ या कार्यक्रमाने महोत्सवास सुरुवात झाली. तर उद्घाटनानंतर डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम झाला. दोन्ही कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. दोन्ही कार्यक्रमांच्या मधल्या वेळेत उद्घाटन व पुरस्कार सोहळा घेण्यात आला. कारण, नावाजलेल्या या कलावंतांच्या कार्यक्रमांना रसिकांची गर्दी होणार होती, हे उघड होते. स्वरसागरच्या स्वतंत्र उद्घाटनासाठी अथवा पुरस्कार वितरणासाठी नागरिक येतील, याची संयोजकांना खात्री नव्हती. मिरवून घेण्याच्या नादात उद्घाटनाच्या दिवशी वेळेचे नियोजन चुकले. प्रमुख पाहुणे येईपर्यंत वेळकाढूपणा करण्यात आला. सुरू असलेल्या कार्यक्रमाला वेळ वाढवून देण्यात आला. पुढे, उद्घाटनाचा कार्यक्रम लांबत गेला, त्याचा परिणाम, ज्यासाठी मोठय़ा संख्येने नागरिक आले होते, तो रसिकप्रिय कार्यक्रम रात्री दहाच्या वेळेची मर्यादा पाळण्याचे बंधन असल्याने अर्ध्या तून गुंडाळावा लागला. त्यामुळे प्रेक्षकांचा रसभंग झाला. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी कार्यक्रमांसाठी अपेक्षित गर्दी झाली नाही. ही कसर शेवटच्या दिवशी भरून निघाली. स्वरसागरसाठी सर्वाधिक गर्दी झालेला कार्यक्रम म्हणून प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या संगीतमय मैफलीचा उल्लेख करता येईल. मात्र, जे उद्घाटनाच्या दिवशी झाले, त्याचीच पुनरावृत्ती समारोपाच्या दिवशी झाली. एखाद्या स्वागत समारंभाच्या धर्तीवर साडेपाचच्या पुढे समारोपाचे कार्यक्रम होतील, असे निमंत्रणपत्रिकेत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार, नियोजन न पाळताच कार्यक्रम होत राहिले. सुरू असलेले कार्यक्रम रात्री आठ वाजता थांबवण्यात आले. महेश काळे यांच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना उभ्यानेच समारोपाची भाषणे सुरू झाली. हक्काच्या मतदारांसमोर राजकीय थाटात भाषण करण्याची संधी पक्षनेत्यांनी सोडली नाही, तेव्हा भाजपचा गोतावळा व्यासपीठावर होता. महेश काळे यांना ऐकण्यासाठी मोठा जमसमुदाय जमला होता. सात वाजेपर्यंत सुरू होणे अपेक्षित असलेला कार्यक्रम प्रत्यक्षात नऊ वाजता सुरू झाला. सत्कार व स्वागताचे सोपस्कार सुरूच होते. महेश काळे गाण्यास सुरुवात करणार, तोच उशिराने प्रवेश केलेल्या आमदारांचाही सत्कार घेण्यात आला. नऊ वाजता सुरू झालेला कार्यक्रम वेळेच्या मर्यादेमुळे वेळेत संपवणे भाग पडले. म्हणजेच उद्घाटन आणि समारोपाच्या दिवशी वेळेचे नियोजन बिघडल्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला.
मोठय़ा प्रमाणात खर्च होतो म्हणून पवनाथडी यात्रेच्या खर्चात बचत करून कार्यक्रमाची संख्या कमी करण्यात आली. जास्त मानधन घेणाऱ्या कलावंतांची नावे कमी करण्यात आली. प्रत्यक्षात पवनाथडीत किती बचत झाली, याविषयी साशंकता आहेच. ती बचतीची भाषा स्वरसागर महोत्सवाच्या वेळी गायब झाली आणि सढळ हातानेखर्च करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्वरसागर महोत्सवाचा खर्च जास्त झाल्याचे सरळ सरळ दिसून येत होते. अशा कार्यक्रमांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी आपली छायाचित्रे लावू नयेत, असे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र, या ठिकाणी मोठय़ा आकारातील छायाचित्रे लावून मुख्य संयोजकांनी चमकून घेण्याची संधी सोडली नाही. काही त्रास नको म्हणून स्वत:बरोबर आयुक्तांचाही फोटो लावून घेतला. महोत्सव चांगल्या प्रकारे यशस्वी होण्यासाठी रसिकांना केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रमांचे नियोजन करण्यात यावे आणि वेळेचे गणित सांभाळून सादरीकरण व्हावे, अशी माफक अपेक्षा रसिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
‘महाराष्ट्र ही कलावंतांची भूमी’
स्वरसागर संगीत महोत्सवाच्या निमित्ताने तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना पं. उल्हास कशाळकर यांच्या हस्ते स्वरसागर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिल्पा आठल्ये व अक्षय घाणेकर यांना पं. पद्माकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ स्वरसागर युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारतीय संगीत ही जगाला मिळालेली देणगी असून महाराष्ट्रात मोठय़ा ताकदीचे अनेक कलावंत झाले आहेत. अशा कलावंतांच्या भूमीत स्वरसागरसारखा दर्जेदार संगीत महोत्सव होतो आहे, हे अभिनंदनीय आहे. समाजाची उंची सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्नतेनुसार मोजली जाते. सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. महापालिकाच अशा कामासाठी पुढाकार घेते, त्याचे विशेष कौतुक आहे, अशा शब्दांत पं. कशाळकर यांनी गौरव केला. पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल पं. तळवलकर यांनी महापालिकेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या महोत्सवाचे स्वरूप खूपच भव्य असून असा महोत्सव घ्यावा, असे महापालिकेला वाटणे हेच महत्त्वाचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com