‘मराठी भाषा’ संकेतस्थळावर गेलात की ‘मराठी भाषेच्या अद्भूत विश्वात आपले स्वागत आहे..’ अशा शब्दात तुमचे स्वागत होते. या संकेतस्थळाचा उपयोग म्हणजे मराठी शब्दांच्या अद्भूत विश्वाची सफरच. शिवाय मराठीजनांसाठी आणखी एक सुखावणारी बातमी म्हणजे अलीकडच्या काळात या संकेतस्थळाच्या माध्यमातून परदेशातूनही मराठी प्रतिशब्दांचा शोध खूप मोठय़ा प्रमाणात घेतला जात आहे.
मराठीत अनेक इंग्रजी शब्दांची भेसळ जोरात सुरू आहे आणि मराठीत चांगले प्रतिशब्द नाहीत असे कारण सांगून मराठीत थेट इंग्रजी शब्दांचा वापर केला जात आहे. मराठीमध्ये हजारो चांगले प्रतिशब्द असतानाही ते वापरले जात नाहीत आणि प्रतिशब्द नसल्याची ओरड केली जाते, ही परिस्थिती पाहून पुण्यातील संजय भगत अस्वस्थ झाले. ते मूळचे स्थापत्य अभियंता आहेत. पाटबंधारे विभागासह विविध शासकीय खात्यांमध्ये त्यांनी नोकरी केली आणि आता अर्थविषयक सल्ला या क्षेत्रात ते काम करत आहेत.
इंग्रजीतील शब्दांना मराठीत चांगले प्रतिशब्द तयार झाले पाहिजेत अशी यशवंतराव चव्हाण यांची प्रबळ इच्छा होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शासनाच्या स्तरावर निर्णय घेऊन मराठी प्रतिशब्द कोश निर्मितीचे काम सुरू करून दिले. त्यानुसार विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन ३५ विषयांवरील कोश तयार केले. अर्थशास्त्र, कृषिशास्त्र, प्रशासन, शिक्षणशास्त्र, साहित्य-समीक्षा, व्यवसाय व्यवस्थापन आदी ३५ विषयांवरील हे कोश आहेत. हे ३५ शब्दकोश उपलब्ध असतानाही इंग्रजीचा शब्दांचा सर्रास होत असलेला वापर बघितल्यानंतर माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या युगात हे शब्दभांडार इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले पाहिजे, असा ध्यास भगत यांनी घेतला. हे कोश उपलब्ध असले तरी त्यांचा वापर यापुढे कमीच होईल हे गृहित धरून भगत यांनी काम सुरू केले. प्रकाशित ३५ शब्दकोशांमधील दोन लाख ६७ हजार शब्द त्यांनी संकेतस्थळाला आवश्यक असणाऱ्या रचनेत टाईप करून घेतले आणि नंतर हे संकेतस्थळ सुरू झाले.
मराठी शब्दांच्या प्रचार-प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळावरील सर्व साहित्य हे मुक्त साहित्य असून त्याचे कोणतेही हक्क राखून ठेवण्यात आलेले नाहीत. अधिकाधिक जिज्ञासूंना त्याचा उपयोग करता यावा हा त्यामागील हेतू असल्याचे भगत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे कोणाचेही आर्थिक साहाय्य न घेता आणि शब्दकोश क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीने आर्थिक सहभागाची तयारी दाखवलेली असतानाही मराठीवरील प्रेमापोटी भगत यांनी स्वखर्चाने हा सर्व उपक्रम केला आहे. प्रत्येक भाषेतील शब्दांमध्ये नव्याने अनेक शब्दांची भर पडत असते. चांगले प्रतिशब्द नव्याने तयार होत असतात. ते रूढ करावे लागतात. भाषेत अशी शब्दांची भर सातत्याने पडली पाहिजे, असे भगत म्हणाले.
या संकेतस्थळाला मोठा प्रतिसाद मिळेल, ते सातत्याने बघितले जाईल अशी अपेक्षा मी ठेवलेलीच नाही. मुख्य म्हणजे मराठीला प्रतिशब्द वापरण्याची, शोधण्याची जिज्ञासा उत्पन्न होणे महत्त्वाचे आहे. त्या जिज्ञासेपोटी या संकेतस्थळाचा उपयोग निश्चितपणे केला जात आहे. जगातील १४० देशातील लोक हे संकेतस्थळ पाहतात. परदेशातूनही या संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठी प्रतिशब्द शोधले जात आहेत, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते, असे भगत यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या व्यवहार कोशाची नव्याने निर्मिती सुरू असून त्या समितीवर सदस्य म्हणून तसेच पुणे महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीवरही सदस्य म्हणून भगत काम करत आहेत. मराठीप्रती आपण काही तरी केले पाहिजे या इच्छेतूनच मी हे काम करतो असे ते सांगतात. ें१ं३ँ्रुँं२ँं.१ॠ हे संकेतस्थळ भगत यांनी तयार केले असून इंग्रजी शब्दाला पर्यायी चांगला शब्द शोधणे त्यामुळे सहज शक्य झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2016 रोजी प्रकाशित
पावणेतीन लाख प्रतिशब्द संकेतस्थळावर उपलब्ध
अलीकडच्या काळात या संकेतस्थळाच्या माध्यमातून परदेशातूनही मराठी प्रतिशब्दांचा शोध खूप मोठय़ा प्रमाणात घेतला जात आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-02-2016 at 01:33 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 75 lakh marathi equivalent term