आरोग्यास असुरक्षित आढळलेल्या रोजच्या वापरातील अन्नपदार्थाबाबत गेल्या चार वर्षांत पुणे विभागात २४१ प्रकरणी न्यायालयीन खटले दाखल झाले आहेत. मिठाईत ठरावीक प्रमाणापेक्षा अधिक खाद्यरंग वापरणे, चांदीच्या वर्खाऐवजी अॅल्युमिनियम वर्ख वापरणे, दुधात साखर तसेच युरिया किंवा डिर्टजटचे अयोग्य प्रमाण आढळणे, मिरची व हळद पावडरीत अखाद्य रंग आढळणे अशा रोजच्या वापरातील पदार्थाविषयी हे खटले दाखल झाले आहेत.
अन्न सुरक्षा व मानदे कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून (ऑगस्ट २०११) आतापर्यंत अन्न व औषध प्रशासनाने आरोग्यास असुरक्षित आढळलेल्या अन्नपदार्थाबाबत न्यायालयात एकूण ७८९ खटले दाखल केले असल्याची माहिती अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली. या खटल्यांमधील २४१ खटले दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थ आरोग्यास असुरक्षित आढळल्याबाबतचे आहेत, तर ५२८ खटले गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थाबाबतचे आहेत. अन्न व्यावसायिकांनी विनापरवाना व्यवसाय केल्याबद्दल देखील २० खटले दाखल झाले आहेत.
मिठाईत १०० पीपीएम (पार्टस पर मिलियन) या प्रमाणात खाद्यरंग वापरण्यास परवानगी आहे. त्याहून अधिक खाद्यरंग वापरला गेल्याचे सिद्ध झाल्यास मिठाई आरोग्यास असुरक्षित समजली जाते. तसेच मिठाईवर चांदीच्या वर्खाऐवजी अॅल्युमिनियमचा वर्ख वापरला गेल्याचेही एफडीएला आढळले आहे. खाद्यतेलात खनिज तेल तसेच अर्जिमोन तेलाचा अंश आढळणे, खाद्यपदार्थात शिसे, आर्सेनिक व पारा अशा घटकांचे असुरक्षित प्रमाण आढळणे, पदार्थ टिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘प्रिझव्र्हेटिव्ह’चे अयोग्य प्रमाण आढळणे, अशा प्रकरणातही अन्नपदार्थ आरोग्यस हानीकारक ठरतो. ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’च्या काही उत्पादकांनी विनापरवाना उत्पादन केल्याबद्दलही त्यांच्यावर खटले दाखल झाल्याचे केकरे यांनी सांगितले.
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी हे प्रतिबंधित पदार्थही आरोग्यास असुरक्षित समजले जातात. सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, ‘गुटखा व तत्सम पदार्थामध्ये गुटखा पावडरीमध्ये गुठळ्या तयार होऊ नयेत म्हणून ‘मॅग्नेशियम काबरेनेट’ हा ‘अँटिकेकिंग एजंट’ वापरतात. गुटखा सतत तोंडात ठेवून चघळणाऱ्यांना तोंडाच्या स्नायूंची ताणले जाण्याची क्षमता कमी होण्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे रुग्णाला तोंड उघडणे कठीण होते. तसेच या प्रतिबंधित पदार्थाचे सेवन तोंडाच्या कर्करोगासही कारणीभूत ठरू शकते.’