रस्ता चुकल्यानंतर शिक्षा झालेल्या बंद्याना देखील शिक्षणाचे महत्त्व उमगले असून गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेले ४२ कैदी पदवीधर झाले आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ‘बंद्याची सुधारणा आणि पुनर्वसन’ हे राज्याच्या कारागृह विभागाचे ब्रीद वाक्य असून त्यानुसारच कारागृहाचे काम चालताना दिसत आहे.
राज्यात सध्या नऊ मध्यवर्ती, २७ जिल्हा, दहा खुली कारागृहं, तर एक खुली वसाहत अशी ४८ कारागृहं आहेत. या कारागृहात साधारण २४ हजार कैदी आहेत. त्यामध्ये साठ ते सत्तर टक्के कैदी न्यायालयीन बंदी आहेत, तर पस्तीस ते चाळीस टक्के कैदी हे शिक्षा झालेले आहेत. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य कारागृह विभागाने शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी मोफत शिक्षणाची सोय केली आहे. त्यानुसार कारागृहात नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामार्फत अभ्यासकेंद्र चालविले जाते. या अभ्यासकेंद्रामार्फत कैद्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विनामूल्य प्रवेश दिला जातो. शिक्षा झालेल्या कैद्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते. साक्षर असलेल्या कैद्यांची अभ्यासक्रमाला बसण्यासाठी वर्षांतून दोन वेळा पूर्वपरीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कैद्यांना त्यांच्या आवडीनुसार कला आणि वाणिज्य शाखेला प्रवेश दिला जातो. त्यानुसार गेल्या वर्षेभरात राज्यातील ४२ कैद्यांनी पदवी घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक कैदी हे नाशिक मध्यवर्ती कारागृहातील (२४)असून, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह (११), नागपूर मध्यवर्ती कारागृह (५) आणि विसापूर आणि अमरावती कारागृहातील प्रत्येकी एक कैद्याचा समावेश आहे.
याबाबत कारागृहाच्या अभ्यासकेंद्राचे मुख्याध्यापक सुहालाल देवरे यांनी सांगितले, की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत कैद्यांसाठी अभ्यासवर्ग आयोजित केले जातात. त्यासाठी कैद्यांना पुस्तके देखील पुरवली जातात. विद्यापीठ सर्व अभ्यासवर्गाची आखणी करून वेळापत्रक पाठविते. त्यानुसारच कारागृह कैद्यांचे वर्ग घेतले जातात. कधी-कधी उच्चशिक्षित कैद्यांना मार्गदर्शन करण्यास सांगितले जाते. वर्षांतून एकदा कारागृहात परीक्षा घेतली जाते. पदवी घेतलेल्या कैद्यांना उच्चशिक्षण घेण्याची सोय केली आहे.
सामाजिक व राज्यशास्त्राकडे कैद्यांचा ओढा
कैद्यांना कारागृहात कला आणि वाणिज्य विषयात पदवी घेण्याची सोय करण्यात आली आहे. कैद्यांचा प्रामुख्याने सामाजिक शास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी घेण्याकडे जास्त ओढा आहे. त्यानंतर भाषा विषय कैद्यांकडून घेतले जातात. कारागृहात प्रात्यक्षिकांचे विषय शिकवले जात नाहीत, असे सुहालाल देवरे यांनी सांगितले.