दुर्धर आजाराला सामोरे जाताना रुग्णाला अर्थसाह्य़ करण्यासाठी यापूर्वी आठ जिल्ह्य़ांत अंमलबजावणी करण्यात आलेली राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना राज्यभरामध्ये लागू करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिक सन्मान कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, महापौर वैशाली बनकर, आमदार जयदेव गायकवाड, बापू पठारे, अनिल भोसले, लक्ष्मण जगताप या प्रसंगी उपस्थित होते.
पवार म्हणाले, विविध ९७२ आजारांमध्ये रुग्णाला दीड लाख रुपयांचे अर्थसाह्य़ करणारी आणि आरोग्य विमा संरक्षण देणारी राजीव गांधी जीवनदायी योजना आठ जिल्ह्य़ांमध्ये कार्यरत आहे. आतापर्यंत ६० हजार कुटुंबीयांना लाभ झाला असून त्यासाठी २०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. ही योजना राज्यभरात लागू करण्याचा मानस असून त्यासाठीची तरतूद करण्यात येणार आहे. केंद्र स्तरावर ज्येष्ठ नागरिकांसाठीचे धोरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील तरतुदींचा विचार करूनच राज्यातील धोरण निश्चित करताना ज्येष्ठांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला जाणार आहे. अनेकांची मुले परदेशात आहेत. तर, योग्य संस्कार करून वाढविलेली मुले लग्नानंतर आई-वडिलांकडे दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागिरकांवर वृद्धापकाळात एकाकी होण्याची वेळ येते. ज्येष्ठ नागिरकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांना कुटुंबामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे.
शहराच्या विकास आराखडय़ामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा उद्यान, नाना-नानी पार्क उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालयामध्ये दहा बेड राखून ठेवण्याची मागणी होत आहे. तर, पेन्शन घेण्यासाठी ज्येष्ठांना रांगेत उभे राहायला लागू नये यासाठी बँकांनी १ ते १० तारखेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पवार यांनी सांगितले.
अप्पा रेणुसे यांनी प्रास्ताविक केले. विशाल तांबे यांनी आभार मानले.
तांबे यांनी परदेशात जाऊ नये
शहरातील पदाधिकारी कोरिया दौऱ्यावर निघाले आहेत. त्यासंदर्भात अजित पवार म्हणाले, पावसाळ्याचे दिवस आहेत. आकस्मिक घटना आणि नैसर्गिक संकट आले, तर शहरामध्ये कोणीतरी थांबले पाहिजे. अधिकारी आपले काम करतील. पण, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही कोणाशी संपर्क साधायचा. स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी पुण्यातच थांबावे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी परदेश दौऱ्याहून लवकर परतावे.