पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतिमार्गावर कंटेनर आणि बलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने दोन्ही गाड्या जात होत्या. मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजलेली नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीचच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत भरधाव वेगात असणाऱ्या बलेरो गाडीने पुढे असणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. यात बलेरो मधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, बलेरो गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातात चालक आणि शेजारी बसणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी लोणावळा ग्रामीण पोलीस आणि देवदूत रेस्क्यू पथक दाखल झाले आहे. अद्याप मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
