पुणे : लेखक आणि प्रकाशकांच्या पूर्वपरवानगीविना पुस्तके प्रकाशित करून अशा पायरेटेड पुस्तकांची विक्री करणाऱ्यांवर आता पोलिसांची थेट कारवाई होणार आहे. यापुढे अशा स्वरूपाचा व्यवसाय होत असल्याचे तसेच पुस्तकांच्या पीडीएफ व्हॉटस्अॅपद्वारे प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश मुंबई पोलिसांनी जारी केला आहे.या गैरप्रकारामुळे लेखकांना स्वामित्व हक्काच्या (रॉयल्टी) रकमेपासून वंचित राहावे लागत होते. तर, प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांपेक्षा ही पुस्तके तुलनेने स्वस्त असल्यामुळे या पुस्तकांना मागणी वाढली होती.  या गैरव्यवहारासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेने  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. 

मुंबई पोलीस प्रशासनाने काढलेला आदेश हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाठपुराव्याचे यश आहे, असे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. र्मिंलद जोशी यांनी सांगितले. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी राज्यभरात केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. टाळेबंदी, थकीत अनुदान आदी  अडचणींचा सामना ग्रंथविक्रेते करीत असताना बनावट पुस्तकांमुळे प्रकाशकांचे नुकसान होत आहे.

पायरेटेड पुस्तकांचा व्यवसाय ही लेखक, प्रकाशकांसह वाचकांची फसवणूकच आहे. त्याचा मोठा फटका साहित्य व्यवहाराला बसत आहे. आता पोलिसांच्या आदेशानुसार कारवाई होणार असल्याने या प्रकारांना आळा बसेल. 

– प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद