कोणत्याही पुस्तकाकडे वाचक आकृष्ट होतात ते त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच. हे मुखपृष्ठ कसे घडते आणि त्यामागचा विचार नेमका काय असतो हे प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांच्याकडूनच साहित्यप्रेमी रसिकांनी शनिवारी अनुभवले. लोकप्रिय साहित्यकृतींच्या ‘मुखपृष्ठाची कथा’ खुद्द चित्रकाराच्या कथनातून विविध आठवणींसह उलगडली.
अक्षरधारा बुक गॅलरी येथे वाचन जागर महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांच्या हस्ते पुस्तकाचे पान उघडून झाले. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, रविमुकुल, ज्योत्स्ना प्रकाशनचे मिलिंद परांजपे आणि अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर या वेळी उपस्थित होते. गेल्या चार दशकांपासून कार्यरत असलेले आणि चार हजारांहून अधिक पुस्तकांसाठी मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावट करणारे रविमुकुल यांनी ‘मुखपृष्ठाची कथा’ या कार्यक्रमाद्वारे विविध पुस्तकांची मुखपृष्ठे पडद्यावर दाखवून त्या चित्रांमागची कहाणी सांगितली.
मुखपृष्ठापासून वाचन जागराची सुरुवात होत असल्याचा आनंद व्यक्त करून रविमुकुल म्हणाले,‘ पूर्वी लेखकाचे हस्तलिखित वाचताना आनंद मिळायचा. वाचन झाल्यानंतर मला त्यातून काय मिळाले ते चित्रातून कसे दाखवायचे याचा विचार सुरू होतो. एका अर्थाने मुखपृष्ठाच्या चित्रामागेही कथा असते. अनेकदा साहित्यकृती ही मला ते चित्र जलरंग, तैलरंग, पेन, पेन्सिल असे चित्राचे माध्यम सुचविते. कोणतेही चित्र रफ किंवा फेअर नसते. ते एक तर चांगले असते किंवा वाईट असते.’
सासणे म्हणाले,‘ ज्याचे वाचन समृद्ध तो संस्कारी आणि चांगला माणूस समजला जातो. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या साहित्यकृतींचे वाचन झाले पाहिजे. माणसाच्या अस्तित्वाचा आणि विचार करण्याचा संबंध हा वाचनाशी जोडला गेला आहे. सध्याच्या काळात वाचन कमी होत असले तरी पुस्तकांची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती होत आहे. मात्र, चांगली पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.’
संगोराम म्हणाले,‘ वाचकांची संख्या वाढत असल्यामुळे पुस्तकांची संख्या वाढली आहे. वाचकांना पुस्तकांपर्यंत नेण्याबरोबरच सर्जनशीलतेची आवड लावण्याच्या उद्देशातून, व्यवसायातील स्पर्धा बाजूला ठेवून सर्व प्रकाशकांनी एकत्र येण्याची ही घटना मराठीप्रेमींसाठी कौतुकास्पद आहे.’
‘त्या’ साहित्यिकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ करण्याची संधी लाभेल?
जी. ए. कुलकर्णी आणि पु. ल. देशपांडे यांचा अपवाद वगळता मराठीतील आघाडीच्या सर्व लेखक आणि कवींच्या पुस्तकांची मुखपृष्ठे करण्याची संधी मला मिळाली आहे. आता लेखकांचे वारसदार पुस्तकांचे प्रकाशक बदलत आहेत. प्रकाशक बदलला की पुस्तकाचे मुखपृष्ठही बदलले जाते. म्हणूनच जीए आणि पुलं यांच्या पुस्तकांसाठी मुखपृष्ठ साकारण्याची संधी मला लाभेल या आशेवर आहे, असे रविमुकुल यांनी सांगितले.