माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राप्रमाणेच चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी असलेल्या पती-पत्नीमध्ये विविध कारणांवरून दुरावा निर्माण होऊ लागला आहे. पत्नी वरिष्ठ अधिरकारी असल्याची ईर्षां, एकमेकांकडून वाढलेल्या अपेक्षा, एकमेकांवर पाळत ठेवणे, कामामुळे बदललेली जीवनशैली, व्यसनाधिनता अशा अनेक कारणांमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असलेल्या पती-पत्नीच्या नात्यात फूट पडताना दिसू लागली आहे. गेल्या वर्षभरात न्यायालयात दाखल झालेले दावे आणि महिला सहायता कक्षाकडे आलेल्या तक्रारीवरून हे दिसून आले आहे.
गुन्हे शाखेच्या महिला सहायता कक्षाकडे गेल्या वर्षभरात अशाच प्रकारच्या १४ पोलीस पती-पत्नीचे अर्ज आले आहेत. त्याच बरोबर न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार, पोटगी आणि घटस्फोटाचे दाखल झालेले दावे यावरून हे दिसून आले आहे. पोलीस खात्यात पत्नी सहायक पोलीस निरीक्षक तर पती पोलीस उपनिरीक्षक असल्यामुळे पतीमध्ये ईर्षां निर्माण होऊन त्यांच्यात वाद होतात. तर काही प्रकरणांमध्ये उलटेही चित्र आहे. दोघेही पोलीस खात्यात असल्यामुळे एकमेकांच्या कामाची माहिती असते. इतर पोलीस अधिकारी कमी वेळेत तपास लावत असले पत्नीला कसा उशीर लागतो, यावरून त्यांच्यात वादावादी होते. पत्नी कुठे जाते, काय करते याची माहिती सतत ती कामावर असलेल्या ठिकाणी फोन करून विचारणे. एकमेकांवरील विश्वास गमवल्यामुळे भांडण होऊन न्यायालयात दावा दाखल केल्याच्या काही घटना आहेत. त्याच बरोबर पत्नी अधिकारी असेल आणि पती पत्नीपेक्षा कमी दर्जाचा अधिकारी असला तरी घरी तिचा सतत अपमान करणे. बाहेर मोठी असशील पण घरात मान खाली घालून वागावे लागेल, असे अपमानास्पद बोलल्यामुळे संसाराला तडा जात आहे. अधिकारी असलेला पती नेहमीच व्यसन करून येतो. घरी कधी जेवत नाही. त्याची येण्याची वेळ निश्चित नाही. आल्यानंतर त्रास देणे या घटनांमुळेही त्यांचे भांडण थेट न्यायालयात जाऊ लागले आहे.
याबाबत अॅड. सुप्रिया कोठारी यांनी सांगितले, की कौटुंबिक न्यायालयात पोलीस दाम्पत्याकडून घटस्फोट, पोटगी आणि कौटुंबिक हिंसाचार असे दावे दाखल आहेत. यामध्ये पतीकडून दाखल करण्यात आलेले दावे हे घटस्फोटाचे तर पत्नीकडून दाखल केलेले दावे हे कौटुंबिक हिंसाचार आणि मुलांसाठी पोटगी मिळावी म्हणून केलेले आहेत. गेल्या वर्षभरात हे दावे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आलेले आहेत. दाखल होणाऱ्या दाव्यांपैकी १५ टक्के दावे हे पोलीस दाम्पत्यांचे आहेत. न्यायालयात दावा दाखल करण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यापासून ते पोलीस निरीक्षकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये तरुण अधिकाऱ्यांबरोबरच पंधरा ते वीस वर्षे खात्यात काम केलेल्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
..अन् पत्नीने सव्र्हिस रिव्हॉल्वर जमा केले!
पत्नी अधिकारी असल्यामुळे तिच्याकडे पोलीस खात्याचे सव्र्हिस रिव्हॉल्वर असते. पती-पत्नीच्या वादात अनेक वेळा पतीकडून तिच्याच रिव्हॉल्वरचा धाक दाखवून धमकाविल्याचे प्रकार घडले. त्यामुळे शेवटी पत्नीने भीतीने स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ते सव्र्हिस रिव्हॉल्वर जमा केले. त्यानंतरही त्यांच्यात वाद कायम राहिल्यामुळे त्यांनी पत्नीच्या विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचे दावे न्यायालयात दाखल केले आहेत.