१९ जिल्ह्य़ात २,७८३ रुग्णांना सेवा
कडक ऊन आणि कायम ४० अंशांच्या वरच राहणारे तापमान अशा परिस्थितीत मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना १०८ या दूरध्वनी क्रमांकाच्या अत्यावश्यक सेवेची मदत झाली आहे. ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्र्हिसेस’च्या या रुग्णवाहिकांनी फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात १९ जिल्ह्य़ात उष्माघाताच्या तब्बल २,७८३ रुग्णांना सेवा दिली आहे.
‘बीव्हीजी-एमईएमएस’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडय़ामध्ये ‘हीट अॅक्शन प्लॅन’ ही मोहीम राबवत आहोत. यात जनजागृतीसह उष्माघाताच्या रुग्णांना प्राधान्याने सेवा दिली जात आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती अशा – दिवसाचे तापमान खूप जास्त असलेल्या भागात ही मोहीम सुरू आहेच, तसेच पश्चिम महाराष्ट्रातही जनजागृती करत आहोत. एमईएमएस रुग्णवाहिका सेवेत चोवीस तास डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची काळजी चांगल्याप्रकारे घेता येते.’ सध्या काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे उन्हाचा ताप कमी झाला आहे. परंतु मागील तीन महिन्यात सातत्याने अधिक राहणाऱ्या कमाल तापमानाचा विदर्भ-मराठवाडय़ातील नागरिकांना चांगलाच त्रास झालेला दिसून येत आहे. उष्माघाताचे सर्वाधिक- म्हणजे ७७१ रुग्ण अमरावतीमध्ये आढळले आहेत. त्याखालोखाल उष्माघाताच्या बाबतीत यवतमाळ (२५७ रुग्ण), औरंगाबाद (२०८), नागपूर (१९१), चंद्रपूर (१५९) आणि नांदेड (१५६) यांचा क्रमांक लागला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2016 रोजी प्रकाशित
उष्माघातासाठी अत्यावश्यक सेवेच्या रुग्णवाहिका सज्ज!
बीव्हीजी-एमईएमएस’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी ही माहिती दिली
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-05-2016 at 05:37 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambulance service give priority to heat stroke patients