पुणे : अफूच्या बोंडांचा चुरा विकण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने लोहगाव परिसरात पकडले. त्यांच्याकडून १६ किलो अफूच्या बोंडांचा चुरा जप्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमराज सोहनलाल बिष्णोई (वय ३२), प्रेमाराम पुनाराम बिष्णोई (वय ३२, दोघे सध्या रा. श्रीकृष्ण काॅलनी, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बिष्णोई मूळचे राजस्थानातील आहेत. दोघे जण लोहगाव परिसरात अफूच्या बोंडांचा चुरा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून अफूच्या बोंडांचा चुरा जप्त करण्यात आला. अफूच्या बोंडांपासून तयार करण्यात आलेल्या चुऱ्याचा वापर नशेसाठी करण्यात येतो. दोघांविरूद्ध् विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, शैलेश सुर्वे, अमोल पिलाणे, मनोज साळुंके, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti narcotics squad seized 16 kg of opium poppy pune print news zws