पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) २०२२मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार नियमित विद्यार्थ्यांना शाळेमार्फत १८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान, तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह २० ते २८ डिसेंबरदरम्यान अर्ज भरता येईल. शाळांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेतल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगिनवर प्रीलिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल. शाळांनी त्याची प्रत मुद्रित करून विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेली माहिती, नोंदवहीतीली माहिती पडताळून विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी .शाळांनी शुल्क भरल्याच्या चलनासह प्रीलिस्ट ४ जानेवारीला विभागीय मंडळात जमा करायची असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. शाळांना चलन डाऊनलोड करून बँकेत शुल्क भरण्यासाठी १८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. सरल प्रणालीद्वारे नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरले जातील. त्यासाठी विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये नोंद असणे आवश्यक आहे. २०२२ मधील परीक्षेसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०, २०२१ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१मध्ये सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत अर्ज भरून परीक्षा देता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2021 रोजी प्रकाशित
दहावीच्या परीक्षेचे अर्ज आजपासून उपलब्ध
सरल प्रणालीद्वारे नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरले जातील.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-11-2021 at 04:11 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Applications available for the 10th class examination to be held in 2022 zws