विधी महाविद्यालय या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी गोखलेनगर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या ‘विनाकारण राजकारण’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुरू झालेल्या ‘बालभारती-पौडफाटा’ संबंधी चर्चेने जन आंदोलनाचे रूप घेतले असून या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळालेला आहे.
विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी १९८७ च्या विकास आराखडय़ात ‘बालभारती-पौडफाटा’ रस्त्याचा पर्याय सुचविण्यात आला. परंतु काही संस्थांनी त्याचा विरोध करून जनहित याचिका दाखल केल्यास न्यायालयासमोर जनसामान्याची बाजू यावी यासाठी ग्रुपवरील कार्यकर्त्यांनी ‘चिमण्या तर वाचवू, पण चिमुकल्या जिवांचे काय?’ असे आंदोलन पंडित आगाशे शाळेसमोर करण्याचे ठरविले. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील त्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केले व त्यांना सर्व राजकीय पक्षांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये उपमहापौर आबा बागूल, आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, अनिल भोसले, दीप्ती चौधरी, नगरसेवक अनिल राणे, दत्ता बहिरट, माधुरी सहस्रबुद्धे, नीलिमा कुलकर्णी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभुस, शिवसेनेचे समन्वयक गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे, नीलेश कदम, शाम सातपुते, उदय महाले, दत्ता गायकवाड, श्रीकांत पाटील, दिलीप उंबरकर आदी सहभागी झाले.
बालभारती-पौडफाटा रस्त्यामुळे विधी रस्ता, कर्वे रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. त्यामुळे कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता मिळेल तसेच प्रदूषणाला आळा बसेल आणि या परिसरातील विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेता येईल, असे सांगत सर्व नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2015 रोजी प्रकाशित
बालभारती-पौडफाटा रस्त्यासाठी सर्वपक्षीयांचे आंदोलन
‘विनाकारण राजकारण’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुरू झालेल्या ‘बालभारती-पौडफाटा’ संबंधी चर्चेने जन आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळालेला आहे.
Written by दिवाकर भावे

First published on: 24-10-2015 at 03:23 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balbharati paud phata road