मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री वंदना घांगुर्डे यांना यंदाचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला असून बुधवारी (२६ जून) हा पुरस्कार त्यांना ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे. प्रतिवर्षी पुणे महापालिकेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
महापौर वैशाली बनकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठी संगीतनाटय़ क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकाराला दरवर्षी बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा या पुरस्कारासाठी वंदना घांगुर्डे यांची निवड करण्यात आली आहे. घांगुर्डे यांनी मराठी रंगभूमीची सेवा करतानाच शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. याच कार्यक्रमात संगीत व गद्य मराठी रंगभूमीची सेवा केलेल्यांचाही खास सन्मान पुरस्कार देऊन केला जातो. या पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ कलाकार रजनी भट, सतारवादक प्रमोद रोटे, संवाद लेखक प्रवीण तरडे, नृत्यांगना योगिता काजळे आणि पुरुषोत्तम करंडक विजेता क्षीतिज दाते यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार प्रदान समारंभ बालगंधर्व रंगमंदिरात बुधवारी सायंकाळी सहा वाजता होणार असून कार्यक्रमानंतर डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे नाटय़रंग हा लोकप्रिय नाटय़संगीताची मैफल अशा स्वरूपाचा कार्यक्रम सादर करणार आहेत.