‘दहा गावं दुसरी, एक गाव भोसरी’ अशी पंचक्रोशीत ख्याती असलेल्या भोसरीतील
सीमा फुगेंचे नगरसेवकपद रद्द झाले, तेव्हापासून आशा लांडगे, सुरेखा लोंढे आदींची नावे आघाडीवर होती. प्रत्यक्षात त्या िरगणात उतरू शकल्या नाहीत. आमदार विलास लांडे व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांच्या साटेलोटय़ातून बाजीरावांची कन्या डॉ. श्रद्धा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. आमदारांच्या धूर्त खेळीने युतीसह राष्ट्रवादीतील इच्छुकांना झटका बसला. डॉ. श्रद्धा यांचा विवाह भाजपचे दिवंगत नेते अंकुश लांडगे यांचे पुतणे रवी यांच्याशी ठरला आहे. ते याच प्रभागातून लढले व थोडक्यात पराभूत झाले. तेथेच श्रद्धाचे भवितव्य ठरणार असून अंकुशराव व बाजीरावांच्या कामाचा फायदा मिळणार आहे. विलास लांडे, महापौर मोहिनी लांडे, नगरसेवक महेश लांडगे, अजित गव्हाणे, नितीन लांडगे अशी तगडी फौज राष्ट्रवादीकडे आहे. तुलनेत शिवसेनेत शुकशुकाट आहे. अशोक कोतवालांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा आहे. खासदार शिवाजीराव आढळराव परदेशात आहेत. उपप्रमुख विजय फुगे, नगरसेविका सुलभा उबाळे यांच्याकडे प्रचाराची धुरा असली, तरी त्यांच्या मर्यादा स्पष्ट आहेत. पै-पाहुण्यांच्या भोसरीत उबाळे, भाजप शहराध्यक्ष एकनाथ पवारांना फार काही ‘कर्तृत्व’ दाखवण्याची संधी नाही.
वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाच्या बाजीराव लांडेंच्या दृष्टीने निवडणूक प्रतिष्ठेची असून मुलीला नगरसेवक करण्याचा त्यांचा आटापिटा दिसून येतो. गेल्यावेळी डॉ. श्रद्धा भाजप उमेदवार होत्या. हक्काचा उमेदवार हातातून गेल्याने त्यांचे पित्त उसळले. पवारांनी मोठा त्याग केल्याचा आवेशात सेनेला जागा सोडल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात, भाजपकडे उमेदवारच नव्हता. आशा लांडगे, सुरेखा लोंढेसह अनेकांकडे विचारणा केली. प्रत्येकीने नकार कळवला. बुडत्या नावेत बसायला कोणी तयार नसल्याने तोंड दाखवायची सोय राहिली नव्हती. आपल्या गळ्यातील लोढणे भाजपने शिवसेनेच्या गळ्यात मारले. मात्र, भाजपवाले प्रचारात फिरकतील का, इथून सुरुवात आहे. पवारांनी आमदारांवर तोफ डागून सर्वाचे लक्ष वेधले. प्रत्यक्षात लांडे व पवारांचा ‘एकमेका साहाय्य करू’ असा छुपा अजेंडा आहे. पवारांनी मदत केल्यामुळे मी आमदार झालो, असे जाहीर वक्तव्य लांडेंनी अनेकदा केले. उबाळे व पवार यांच्यातील कलगीतुरा जगजाहीर आहे. एकमेकांचे तोंडही न पाहणाऱ्या त्या दोघांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे निवडणूकजिंकण्याचा दावा करत यापुढे एकोप्याने काम करू, अशी ग्वाही दिली. बडय़ा बाता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी युतीला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीची फौज अन् शिवसेनेत शुकशुकाट – भोसरी पोटनिवडणूक एकतर्फीच
वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाच्या बाजीराव लांडेंच्या दृष्टीने निवडणूक प्रतिष्ठेची असून मुलीला नगरसेवक करण्याचा त्यांचा आटापिटा दिसून येतो.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 25-06-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhosari bi election seems tobe onesided