लोणावळा ग्रामीण परिसरातील तुंग येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रगतशील शेतकरी आणि व्यवसायिकांच्या नावाने जादूटोणा केल्याची घटना उघडकीस आली आहे. काळ्या बाहुल्यांवर व्यक्तींचे फोटो लावून लिंबू, खिळे, बिबा, टाचणी मारून झाडाला ठोकल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित नऊ जणांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दिली आहे.

पांडुरंग कृष्णा जांभुळकर, संदीप एकनाथ पाठोर, संजय धोंडू कोकरे, किसन बंडू ठोंबरे, योगेश श्रीराम घाडगे, संतोष कोंडीबा घारे, अजय कुमार मेहता, कैवशर शेख, मनोज सेनानी अशी या प्रगतशील शेतकरी आणि व्यवसायिकांची नावं आहेत. जादूटोणा करण्यासाठी यांचे फोटो वापरण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा ग्रामीण येथील तुंग परिसरातील इसार हायस्कूलजवळ हा प्रकार घडला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर काळ्या बाहुलीवर फोटो त्यावर लिंबू आणि बिबा लावून पुन्हा लिंबू लावत टाचण्या, खिळ्याने ते झाडाला ठोकले आहेत. लाल कपड्यात नारळाने भरलेले गाठोडे देखील झाडाला बांधलेले आहे. जादूटोणा, भानामती, करणी करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत सांगण्यात आलं आहे. संबंधितांची प्रगती सहन होत नसल्यानेच हा प्रकार केला असावा असंही तक्रारीत म्हटलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

अंनिसचे मिलिंद देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “असे प्रकार लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी केले जातात. जादूटोणा कायद्याअंतर्गत असे प्रकार करणे गुन्हा आहे. या बाबत ज्याने कोणी हे कृत्य केले आहे त्याला शिक्षा होऊ शकते”.