जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, जर्मन बेकरीसह मुंबई, सूरत, बंगळुरु, अहमदाबाद येथे बाँबस्फोट घडविणारे रियाज भटकल, इक्बाल भटकल, मोहसीन चौधरी हे प्रमुख आरोपी अद्याप फरार आहेत. तपास यंत्रणांकडून त्यांचा शोध सुरूच आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी बाँबस्फोट घडविण्यात आला होता. या बाँबस्फोटात सतराजण जागीच ठार झाले होते तसेच ५८ जण जखमी झाले होते. इंडियन मुजाहिदीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या रियाज भटकल, यासिन भटकल, इक्बाल भटकल, मोहसीन चौधरी यांनी जर्मन बेकरीत बाँबस्फोट घडविल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मराठवाडय़ातील उदगीर येथील हिमायत बेग याच्या घरात भटकल बंधूनी आरडीएक्स ठेवल्याची माहिती तपासात निष्पन्न झाल्यानंतर सप्टेंबर २०१० मध्ये राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेग याला जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणात अटक केली होती.
बेग याच्याविरुद्ध कट रचणे, खून, बनावट कागदपत्रे तयार करणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, स्फोटके बाळगणे आदी कलमांखाली पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सन २०१३ मध्ये त्याला दोषी ठरवून विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. एटीएसचे तत्कालीन प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक राकेश मारिया यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद सातव, पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, अतुल सबनीस, मिलिंद गायकवाड, दिनेश कदम यांनी हा तपास केला होता. बेग हा इंडियन मुजाहिदीनचा हस्तक असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, बेग याने त्याच्या वकिलांमार्फत पुण्यातील न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
पुणे शहर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याच्या सूचना तपास यंत्रणांनी जर्मन बेकरी बाँबस्फोटप्रकरणापूर्वी दिल्या होत्या. देशभरात घातपाती कारवाया करणाऱ्या इंडियन मुजाहिदीनने पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या अशोका म्युज या इमारतीत सदनिकेत मीडिया सेल सुरू केले होते. सन २००८ मध्ये मुंबई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तेथे छापा टाकून दहाजणांना गजाआडही केले होते.
रियाज भटकल आयसीसमध्ये
जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रियाज भटकल, इक्बाल भटकल आणि यासीन भटकल हे मूळचे कर्नाटकातील भटकल परिसरातील रहिवासी आहेत. तर मोहसीन चौधरी हा पुण्यातील कोंढवा परिसरात राहणारा आहे. जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणात रियाज, इक्बाल आणि मोहसीन हे फरारी आहेत. रियाज हा आयसीस या दहशतवादी संघटनेत सामील झाला असल्याचा संशय तपासयंत्रणांना आहे तर यासीन याला गेल्या वर्षी राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
जर्मन बेकरीसह देशभरातील बाँम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरूच
जर्मन बेकरीसह मुंबई, सूरत, बंगळुरु, अहमदाबाद येथे बाँबस्फोट घडविणारे रियाज भटकल, इक्बाल भटकल, मोहसीन चौधरी हे प्रमुख आरोपी अद्याप फरार आहेत. तपास यंत्रणांकडून त्यांचा शोध सुरूच आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 18-03-2016 at 02:37 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bomb blast absconding accused