बिल्डर आणि राजकीय लागेबांधे असलेल्यांनी नाले बुजवले, तरी त्यांच्यावर कोणताही कारवाई न करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांनी बाणेर भागात केलेल्या नव्या उपद्व्यापामुळे प्रो. हेमकांत केणी हे अनिवासी भारतीय ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत. ज्यांनी नाला बुजवला त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता महापालिका अधिकाऱ्यांनी चक्क केणी यांच्या बागेतून जबरदस्तीने नाला घुसवण्याचा प्रकार केला असून हा प्रकार करताना झाडे कापण्याबरोबरच त्यांची बागही उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
इंग्लंडमध्ये राहून तेथे गेली पन्नास वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात असलेले प्रो. हेमकांत केणी आणि हेमा केणी यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे.

बाणेर ते राम नदी दरम्यान वाहणाऱ्या वीस फूट रुंदीच्या नैसर्गिक नाल्याची रुंदी बांधकामांमुळे आता दोन-तीन फूट इतकी कमी झाली आहे.

महापालिकेची ही दंडेलशाही पाहून ते आता हतबल झाले आहेत. बाणेर मधील राम इंदू पार्क येथे केणी यांनी १९९४ मध्ये भूखंड घेऊन तेथे बंगला बांधला. ते दर पाच-सहा महिन्यांनी पुण्यात येतात. बाणेर भागातून वाहत जाणारा आणि राम नदीला मिळणारा एक मोठा नैसर्गिक नाला त्यांच्या बंगल्याच्या हद्दीबाहेरून पूर्वापार वाहत होता. त्याचे पात्र पंधरा ते वीस फूट रुंद होते. हळूहळू या भागात बांधकामे सुरू झाली आणि नाला बुजू लागला. त्यामुळे दर पावसाळ्यात नाल्याचे पाणी मोठय़ा प्रमाणावर केणी यांच्या बंगल्यात घुसू लागले.
नाला बुजवण्याच्या या प्रकाराकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर पाण्याचा त्रास नको म्हणून केणी यांनी स्वत:हून त्यांच्या बागेतून स्वखर्चाने पाणी वाहून जाण्यासाठी चर खणून दिला. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांत वीस फूट रुंदीचा मूळ नाला अतिक्रमणांमुळे व बांधकामांमुळे अवघा दोन-तीन फूट रुंदीचा झाला आणि चरातून पाणी वाहून जाण्याऐवजी केणी यांच्या बंगल्यात पुन्हा पाणी घुसू लागले. या पाण्यातून मोठय़ा प्रमाणावर दरुगधी, राडारोडा, सांडपाणी, कचरा व प्लास्टिक वाहत येते. त्यामुळे अखेर केणी यांनी हा चर बंद करून मूळ नाल्याचे पात्र पूर्ववत रुंद करावे व ते मोकळे करावे, अशी मागणी महापालिकेकडे सातत्याने केली.
या मागणीची कोणतीही दखल

हा नाला प्रो. हेमकांत केणी यांच्या बंगल्यातून आता अशाप्रकारे नेला जाणार आहे.

न घेता तुमच्या बागेतून जाणारा हा चर नाही, तर तोच मूळ नाला आहे, असा दावा करत महापालिका अधिकाऱ्यांनी गेल्या आठवडय़ात केणी यांच्या बंगल्यातील चर रुंद करून तेथे नाला करण्याचे काम सुरू केले. विशेष म्हणजे हा नाला आता दोन ठिकाणी काटकोनात वळवण्यात आला आहे. नैसर्गिक नाले अशाप्रकारे जागोजागी काटकोनात वळणारे होते का, अशी विचारणा केणी यांनी केली आहे. मात्र, त्यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही आक्षेपाला उत्तर न देता उलट अरेरावी करून नाला इथूनच वाहील, अशी भाषा पालिकेचे अधिकारी वापरत आहेत.
महापालिका अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीचा जो अनुभव केणी यांना येत आहे, त्यामुळे कायदा पाळणाऱ्यांची येथे काहीच कदर नाही का, अशीही विचारणा त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.