पर्यावरण आणि आरोग्य रक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल

पुणे : पर्यावरणासह मानवी आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने भारतीय रेल्वेने महत्त्वाचे पाऊल टाकले असून, त्याअंतर्गत रेल्वे गाडय़ांमध्ये जैव-शौचालयाची सुविधा देण्यात येत आहे. मध्य रेल्वेने यात पुढाकार घेत आपल्या सर्व डब्यांमध्ये जैव-शौचालये बसविली आहेत. देशभरातील रेल्वे गाडय़ांमध्ये सध्या अडीच लाखांहून अधिक जैव-शौचालये बसविण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वे गाडय़ांमध्ये साध्या रचनेच्या शौचालयांमुळे लोहमार्गावर मानवी मलमूत्र जमा होऊन त्याचा मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावरही परिणाम होत होता. अधिक कालावधीत गाडय़ा थांबत असलेल्या स्थानकामध्ये ही समस्या अधिकच तीव्र होती. त्यामुळे स्थानकाच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर दुर्गंधी पसरत होती. या सर्वावर उपाय म्हणून रेल्वेच्या डब्यांमध्ये जैव-शौचालय बसविण्याचा निर्णय रेल्वेने काही वर्षांपूर्वी घेतला होता. प्रत्येक विभागाला आपापल्या गाडय़ांमधील साध्या रचनेच्या शौचालयाऐवजी जैव-शौचालय बसविण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार मध्य रेल्वेने त्यांच्याकडील सर्व गाडय़ांमधील सुमारे पाच हजार डब्यांमध्ये जैव-शौचालये बसविली असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

जैव-शौचालयासाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये शौचालयाच्या खालील बाजूला विशेष रचनेची टाकी बसविण्यात आली आहे. मोठय़ा आकाराच्या या टाकीमध्ये जीवाणूंची पैदास केली जाते. या जीवाणूंच्या माध्यमातून मानवी मैल्याचे रूपांतर पाण्यामध्ये केले जाते. त्याचप्रमाणे या पाण्यालाही क्लोरिनच्या मदतीने स्वच्छ केले जाते. त्यामुळे कोठेही थेट लोहमार्गावर मानवी मैला पडत नाही. जैव-शौचालयाच्या टाकीतून केवळ प्रदूषणमुक्त पाणी बाहेर टाकले जाते. रेल्वेच्या जुन्या आणि वापरात असलेल्या डब्यांमध्ये ही शौचालये बसविण्यात आली आहेत. नव्याने निर्मिती होत असलेल्या डब्यांमध्ये आता जैव-शौचालयेच बसविण्यात येत आहेत. त्यामुळे काही वर्षांत भारतातील सर्व रेल्वे गाडय़ांतून जुनी शौचालये हद्दपार होतील, असा विश्वास रेल्वेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिदिन २.७४ लाख लिटर मलमूत्र..

रेल्वे गाडय़ांतील पूर्वीच्या शौचालयांमधून मानवी मलमूत्र थेट लोहमार्गावर पडत होते. त्यातून निर्माण होणारी समस्या दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने जैव-शौचालये बसविण्याची व्यापक मोहीम हाती घेतली. संपूर्ण भारतात सध्या सुमारे ७३ हजार रेल्वे डब्यांमध्ये दोन लाख ५८ हजार ९०६ जैव-शौचालये बसविण्यात आली आहेत. त्या माध्यमातून प्रतिदिन सुमारे २ लाख ७४ हजार लिटर मानवी मलमूत्र थेट लोहमार्गावर पडण्यापासून बचाव होत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway took the initiative to install bio toilets in all its coaches zws