गुजरातचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी शुक्रवारी पुणे दौऱ्यावर येत असल्याने दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत शहरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.
मोदी यांचे दुपारी दीडच्या सुमारास पुण्यात आगमन होणार आहे. त्यानंतर विमानतळ परिसराच्या बाहेर त्यांच्या स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता त्यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन होणार असून, त्यानंतर मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णालयाचा जाहीर कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. रुग्णालयाचा हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे.
मोदींच्या या दौऱ्यामुळे विमानतळ रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गल्ली या रस्त्यांचा वापर वाहनचालकांनी टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. फाईव्ह नाईन चौक, पेट्रोलसाठा चौक, विमानतळ, रामवाडी जंक्शन रस्ता या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता (नळ स्टॉपपर्यंत), गुळवणी महाराज रस्ता (अभिषेक हॉटेल चौकापर्यंत), इम्रानभाई शेख रस्ता, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल समोरील गल्ली, डीटीएल मॉल ते हिमाली सोसायटी रस्ता या भागामध्ये दुपारी बारा ते रात्री आठ या वेळेत वाहने लावू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.