वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळवून देतो म्हणून एका व्यक्तीकडून चौदा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमन गोविंद इलख (वय ५०, रा. विश्वजीत प्रकाश टॉवर, पश्चिम ठाणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून सौरभ साळसकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलख यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश हवा होता. त्यामुळे त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून साळसकर याच्याशी संपर्क साधला. साळसकर याने इलख यांना त्यांच्या मुलीस डीवाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांच्याकडून १४ लाख रुपये घेतले. मात्र, त्यांच्या मुलीस प्रवेश मिळवून न देता घेतलेले पैसेही न देता फसवणूक केली, अशी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिघे हे अधिक तपास करत आहेत.