छत्तीसगडमधील हजारो नागरिकांकडून चिटफंडच्या नावाखाली पैसे घेऊन त्यांची कोटय़वधीची फसवणूक केल्याच्या प्रकरणात चिंचवडमधील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून, छत्तीसगड पोलिसांनी शुक्रवारी रात्री चिटफंडच्या संचालक असलेल्या महिलेला अटक केली. या गुन्ह्य़ातील प्रमुख आरोपी असलेला या महिलेचा पती व मुलगा फरार आहे.
वंदना भापकर (रा. सुखवानी उद्यान, लिंकरोड, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती बाळासाहेब भापकर व मुलगा शशांक भापकर हे दोघे फरार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने २००७ मध्ये छत्तीसगडमध्ये साईप्रसाद या नावाने चिटफंड सुरू केले. प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये सभासद मिळविण्यासाठी त्यांनी सर्व ठिकाणी एजंटांचीही नेमणूक केली होती.
लोकांनी गुंतविलेले पैसे सहा वर्षांत दुप्पट करून देणार किंवा त्या बदल्यात जमीन देणार, असे आमिष दाखवून भापकर कुटुंबीयांनी दहा हजारांहून अधिक लोकांकडून पाच ते सहा कोटी रुपये जमा केले व त्यांची फसवणूक केली. या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी छत्तीसगड पोलीस चिंचवड येथे आले होते. त्या वेळी त्यांनी वंदना भापकरच्या अटकेची कारवाई केली. तिला पिंपरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला छत्तीसगड येथे नेण्याची परवानगी दिली.