नालेसफाई संथगतीने; कामे ५० टक्के पूर्ण झाल्याचा दावा, पावसाळय़ापूर्वी कामे पूर्ण होण्याबाबत प्रश्नचिन्ह

पावसाळय़ात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा, यासाठी पावसाळापूर्व कामे करण्याची प्रक्रिया यंदा लवकर सुरू करण्यात आली असली तरी या प्रकारची कामे संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

पुणे : पावसाळय़ात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा, यासाठी पावसाळापूर्व कामे करण्याची प्रक्रिया यंदा लवकर सुरू करण्यात आली असली तरी या प्रकारची कामे संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या पंधरा जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याची सूचना महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी केली आहे. पावसाळा पूर्व करावयाची कामे पन्नास टक्के पूर्ण झाली आहेत, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी कामांचा संथ वेग पाहता पावसाळय़ापूर्वी कामे होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरवर्षी पावसाळापूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, कल्व्हर्ट, पावसाळी वाहिन्या आणि गटारांची स्वच्छता महापालिकेकडून केली जाते. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावर निविदा मागविली जाते. मात्र कामे पावसाळय़ापूर्वी होत नसल्याने आणि ती घाईगडबडीत होत असल्याने निकृष्ट कामांचा दर्जा सातत्याने पुढे आला होता. पावसाळय़ात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्याने प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे यंदा नालेसफाई आणि पावसाळापूर्व कामे लवकर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियाही तातडीने पूर्ण करून मे अखेपर्यंत कामे पूर्ण करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जाहीर केले होते. मात्र कामांचा वेग पाहाता ती वेळेत पूर्ण होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या जुन्या आणि नव्या हद्दीतील नाले आणि उपनाल्यांची एकूण लांबी ६४७ किलोमीटर एवढी आहे. त्यावर एकूण ७४२ कल्व्हर्ट आणि १२ बंधारे आहेत. त्यापैकी ९७ किलोमीटर लांबीचे नाले आणि २२१ कल्व्हर्टची सफाई झाल्याचा दावा महापालिका प्रशासननाकडून करण्यात आला आहे. शहरात एकूण ३२५ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या आहेत. त्यावर ५५ हजार ३०० पाण्याचा निचरा होण्यासाठीचे आवश्यक चेंबर आहेत. त्यापैकी १०२ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची, तर २२ हजार ९५४ चेंबर्सची साफसफाई करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अतिरिक्त आयुक्तांवर जबाबदारी

पावसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या तीन अतिरिक्त आयुक्तांवर विभागनिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पुराचा धोका असणाऱ्या ठिकाणांची कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांना आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. पंधरा जूनपर्यंत कामे पूर्ण करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cleaning slowly claim work complete question marks completion work monsoon ysh

Next Story
नाटय़गृह चालकांशी चर्चा करा
फोटो गॅलरी