महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक ‘परिवर्तन’ या स्वयंसेवी संस्थेच्या युवक, युवतींनी तयार केले असून प्रभागात लाकडी बाक बसवणे हे नगरसेवकांचे सर्वात लाडके काम असल्याचे या प्रगतिपुस्तकातून स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी परिवर्तन संस्थेने नगरसेवकांचे पाच वर्षांचे प्रगतिपुस्तक तयार केले होते. यापुढे प्रत्येक वर्षांचे प्रगतिपुस्तक तयार केले जाणार असून त्यानुसार पहिल्या वर्षांचे प्रगतिपुस्तक शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले. नगरसेवकांना वॉर्डस्तरीय कामांसाठी जो निधी मिळतो त्याचा वापर कोणत्या कारणांसाठी करण्यात आला, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील नगरसेवकांची उपस्थिती किती राहिली आणि सर्वसाधारण सभेला नगरसेवकांनी दिलेले लेखी प्रश्न या तीन मुद्यांच्या आधारे प्रत्येक नगरसेवकाची वर्षभराची माहिती गोळा करून त्या आधारे प्रगतिपुस्तक तयार केल्याचे उपक्रम समन्वयक यशस बेदरकर, सचिव तन्मय कानिटकर, सहसचिव प्रियांका सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाल्याचेही सांगण्यात आले.
नगरसेवकांनी गेल्या आर्थिक वर्षांत १९ कोटी ८५ लाख ५४ हजार ९१४ रुपये एवढी रक्कम वॉर्डस्तरीय निधीतून खर्च केली आहे. त्यातील सर्वाधिक तब्बल तीन कोटी ६४ लाख रुपये बाकडी टाकणे या कामावरच खर्च झाले आहेत. पुण्यातील १५२ नगरसेवकांपैकी १२६ नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डस्तरीय निधीतील काही ना काही रक्कम या कामावर खर्च केली आहे. ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी ज्या बादल्या घरोघरी वाटल्या जातात त्यावर नगरसेवकांनी एक कोटी आठ लाख रुपये खर्च केल्याचेही प्रगतिपुस्तकात दिसत आहे. तर, प्रभागातील छोटे रस्ते आणि गल्ली, बोळांचे काँक्रिटीकरण या कामासाठी देखील दोन कोटी ११ लाख रुपये खर्च झाले आहेत.
अनेक नगरसेवकांनी वेगवेगळ्या शाळांमध्येही वॉर्डस्तरीय निधी वापरला असून त्यावर एक कोटी १३ लाख रुपये खर्च झाला आहे आणि त्यातील ६१ लाख ७८ हजार रुपये संगणक वाटपावर खर्च झाले आहेत. कचऱ्यासाठी ज्यूट पिशव्या वाटपावरही नगरसेवकांनी वॉर्डस्तरीय निधीतून ६२ लाख रुपये खर्च केल्याचे दिसत आहे.
सर्वाधिक उपस्थिती
भाजपच्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, स्मिता वस्ते आणि शिवसेनेचे नगरसेवक अशोक हरणावळ या तीन नगरसेवकांची सर्वसाधारण सभेतील उपस्थिती शंभर टक्के असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेत निवडून गेलेल्या १५२ आणि पाच स्वीकृत अशा १५७ नगरसेवकांपैकी १११ नगरसेवकांनी वर्षभरात सर्वसाधारण सभेला एकही लेखी प्रश्न दिलेला नाही, तर शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी आतापर्यंत सर्वाधिक ३३ प्रश्न सभेला देऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. हे प्रगतिपुस्तक संस्थेच्या ‘परिवर्तनभारतडॉटओआरजी’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2013 रोजी प्रकाशित
नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक प्रकाशित
प्रभागात बाकडी बसवणे हे नगरसेवकांचे सर्वात लाडके काम असल्याचे या प्रगतिपुस्तकातून स्पष्ट झाले आहे.

First published on: 06-07-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporators progress card published