पुणे विद्यापीठाने मान्यता काढून घेतलेली असतानाही विद्यार्थ्यांला दुसऱ्या वर्षांला प्रवेश दिल्याचे खोटे सांगून त्यांच्याकडून प्रवेशशुल्क घेतल्याप्रकरणी मुळशी येथील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलजी अॅन्ड रिसर्च’ या महाविद्यालयाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याप्रकरणी मनोज अनिल घाटुळे (वय २३, रा. थेरगाव) यांनी याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. घोटुळे यानी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलजी अॅन्ड रिसर्च महाविद्यालयात २००८ मध्ये प्रवेश घेतला होता. पहिले वर्ष पूर्ण झाल्यानंतर २०१० मध्ये महाविद्यालयाची विद्यापीठाने मान्यता काढून घेतली. कॉलेज प्रशासनाने प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्याचे सांगून त्यांच्याकडून दुसऱ्या वर्षांची प्रवेश शुल्क घेतले. मात्र, त्यानंतर महाविद्यालयाची मान्यता रद्द झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सांगितले. तक्रारदार घाटुळे यांनी भरलेले प्रवेशशुल्क परत देण्याची मागणी केली. मात्र, ती प्रशासनाने दिली नाही. त्यामुळे त्यांनी अॅड. संग्रामसिंह देसाई, अॅड. विकास घाटुळे, अॅड.कविता शिवरकर यांनी न्यायालयात  तक्रार केली. न्यायालयाने या प्रकरणाच्या कागदपत्रांची पाहणी केली. विद्यार्थ्यांची प्रथमदर्शनी फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित महाविद्यालयाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.