महिलेच्या नावाने केलेल्या फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून पिंपरीतील एका व्यापाऱ्याच्या भावाला जाळ्यात ओढून एक कोटीच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. िपपरी पोलिसांनी नगर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून एखाद्या चित्रपटातील थरारनाटय़ शोभेल, अशा पद्धतीने दोन महिलांसह सहा जणांची टोळी गजाआड केली. या टोळीतील सुंदर महिलेचा फोटो वापरून, मात्र खोटे नाव देऊन हे फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले होते. त्याद्वारे त्यांनी महिनाभर चॅटिंग केल्यानंतर अपहरणाचा डाव साधला.
अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांनी पत्रकार परिषदेत िपपरी ते नगर दरम्यानच्या या गुन्ह्य़ाचा नाटय़मय प्रवास सांगितला. उपनिरीक्षक हरिष माने, हवालदार सुहास पाटोळे, विलास केकाण, मारुती लोंढे आणि नगर पोलीसातील मंगेश खरमाळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या या घटनेत मूळ दिल्लीच्या असलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह सहा जणांना अटक केली.
मुत्याल म्हणाले, िपपरीतील व्यापारी नंदलाल मूलचंदाणी यांचे भाऊ घनश्याम सुरतोमल मूलचंदाणी (वय ४०) यांचे अपहरण झाले, भावाच्या सुटकेसाठी त्यांच्याकडे एक कोटींची मागणी करण्यात आली. नगर पोलीस व िपपरी पोलिसांच्या पथकाने नगरच्या चिंचोली पाटी जामखेडनगर रस्त्यावरील शेतात डांबून ठेवलेल्या घनश्यामचा शोध घेतला व सुखरूप सुटका केली. आरोपींनी टोळीतीलच एका महिलेचा फोटो टाकून खोटय़ा नावाने फेसबुक अकाउंट उघडले होते. त्याद्वारे ते घनश्यामशी महिनाभर चॅटिंग करत होते. फेसबुकवरून मैत्री झालेली ती महिला घनश्यामला भेटण्यासाठी िपपरीत आली, प्रतिशिर्डीत नवस फेडायला जायचे आहे, मला ते ठिकाण माहिती नसल्याचे सांगून घनश्यामला सोबत नेले.
दर्शन घेऊन परतत असताना मागाहून येत असलेल्या टोळीतील अन्य सदस्यांनी घनश्यामला आडोशाला घेत बेदम मारहाण केली. बेशुद्ध झाल्यानंतर त्याला मोटारीत घालून नगरला नेले आणि हातपाय व तोंड बांधून डांबून ठेवण्यात आले. खंडणीची रक्कम मागण्यात आल्यानंतर बंधू नंदलाल यांनी िपपरी पोलिसांशी संपर्क साधला. आधुनिक तंत्राचा वापर करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. नगरचे ठिकाण स्पष्ट झाल्यानंतर हरिष माने यांचे पथक तेथे पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने नाटय़मय रीत्या आरोपींना जेरबंद केले.
‘पॅरोल’वर बाहेर असलेल्या गुन्हेगाराचा सहभाग
आरोपींची माहिती आत्ताच उघड करण्यास पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली. मात्र, खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर बाहेर असतानाही या गुन्ह्य़ात सहभागी असलेल्या सराईत दीपक ढाकणे याची सविस्तर माहिती प्रकाश मुत्याल यांनी पत्रकारांना दिली. २० ऑक्टोबर २०१४ मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला, त्यानंतर वेळोवेळी त्याने मुदत वाढवून घेतली. शिरूर येथील कंत्राटी कामगारांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी असून तो या घटनेचा सूत्रधार आहे. फेसबुक अकाउंटला फोटो असलेल्या महिलेचा गुन्ह्य़ातही सक्रिय सहभाग आहे. या घटनेतील विविध कंगोरे तपासले जात असल्याचे सांगून मुत्याल यांनी फेसबुकचा गैरवापर व त्यातील धोक्यांपासून सावध राहावे, असे आवाहन केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘फेसबुक’द्वारे जाळ्यात ओढून व्यापाऱ्याच्या भावाचे अपहरण
फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून पिंपरीतील एका व्यापाऱ्याच्या भावाला जाळ्यात ओढून एक कोटीच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

First published on: 26-01-2015 at 01:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime facebook police arrest