डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करत असताना गुन्हेगारांवरील देखरेख आणि त्यांच्या तपशिलाबाबतच्या अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. मात्र, एक समाधानाची गोष्ट म्हणजे, या तपासाच्या निमित्ताने राज्यातील सराईत गुन्हेगारांचा तपशील एकत्रित झाला आहे. त्याचा पुढील काळात निश्चित फायदा होणार आहे, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात सीआयडीचे २६ अधिकारी आणि कर्मचारी मदत करत आहेत. सीआयडी प्रमुख एस. पी. यादव हे दोन दिवसाला आढावा घेत आहेत. या तपासाबाबत पुण्याचे सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल हे समन्वय करत आहेत. डॉ. दाभोलकर यांचा तपास सर्व राज्यात केला जात आहे. हा तपास करताना पोलीस दलातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजची रेकॉर्डिग, कॉल ट्रॅकिंग व्यवस्थित होत नाही. सराईत गुन्हेगार, अग्निशस्त्र वापरणारे, पॅरोलवर बाहेर आलेले गुन्हेगार, चोरीच्या दुचाकी चोरणारे या बाबतचा एकत्रित असा तपशील नसल्याचे आढळून आले आहे. त्याच बरोबर या आरोपींवर देखरेखीची सोय नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या त्रुटी कशा दूर करता येतील याचा पोलीस विचार करत आहेत. या तपासाची दुसरी बाजू म्हणजे, या गुन्ह्य़ाचा तपास करत असताना राज्यातील सराईत गुन्हेगार, पॅरोलवर बाहेर आलेले गुन्हेगार, अग्निशस्त्र वापरणारे, सुपारी घेऊन हत्या करणारे यांचा तपशील एकत्रित झाला आहे. त्या तपशिलाचा पुढील काळात गुन्ह्य़ांचा तपास करताना निश्चित फायदा होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2013 रोजी प्रकाशित
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासामुळे राज्यातील सराईत गुन्हेगारांचा तपशील एकत्रित
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करत असताना गुन्हेगारांवरील देखरेख आणि त्यांच्या तपशिलाबाबतच्या अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
First published on: 28-09-2013 at 02:51 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal details compile in dabholkar murder case inquiry