आधुनिक डिजिटल युगामध्ये युवा पिढी तंत्रस्नेही झाल्याचा फटका नववर्षाच्या डायरी विक्रीला बसला आहे. कागदाच्या किमतीमध्ये दरवाढ झाल्यामुळे डायरीच्या दरात किमान १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नव्या वर्षाचे स्वागत करताना सध्या डायरी खरेदी धीम्या गतीने सुरू आहे. करोनाच्या दोन वर्षांनंतर प्रतिसाद कसा मिळेल ही शंका असल्याने कंपन्यांनी डायरीच्या प्रतींची संख्या मर्यादित ठेवली आहे.

हेही वाचा- पुणे: यूजीसीच्या अनुदानासाठी आता नॅक मूल्यांकन बंधनकारक; यूजीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

कागदाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून डायरीच्या दरामध्ये किमान १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. समाजमाध्यमांवर सक्रिय असलेली युवा पिढी प्रत्यक्ष टिपण काढत नसल्याचा फटका डायरीच्या विक्रीवर झाला आहे, असे चॉईस बुक डेपोचे अतुल कटारिया यांनी सांगितले. आप्पा बळवंत चौकातील व्यापाऱ्यांची डायरी विक्रीची उलाढाल साधारणपणे एक कोटी रुपयांच्या घरात होते. सध्याचा प्रतिसाद पाहता जानेवारीच्या मध्यापर्यंत तेवढीच उलाढाल होईल. पण, डायरीच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याने डायरीच्या प्रतींची संख्या मर्यादित असेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा- पुणे : येरवड्यात दोन गटात हाणामारी; अकरा सराईत गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कर्मचाऱ्यांना डायरीचे वितरण करतात. हे कर्मचारी अजूनही घरूनच काम करत आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून डायरीची मागणी झालेली नाही. त्यातच अजूनही करोना येईल अशी शक्यता निर्माण झाली असल्याचा परिणाम डायरी खरेदीवर झाला आहे, अशी माहिती व्हीनस ट्रेडर्सचे विनोद करमचंदानी यांनी दिली. डायरी खरेदी तुलनेने कमी होत आहे. त्यातही नेहमीच्या डायरी खरेदीपेक्षा तारीख-वार नसलेल्या डायरी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

हेही वाचा- पुणे: खराब पाव परत केल्याने बेकरीचालकाकडून मुलाला मारहाण; भवानी पेठेतील घटना

करोना हे निमित्त असले तरी लेखनाचे प्रमाण कमी झाल्याचा फटका डायरी विक्रीवर गेल्या काही वर्षांपासून होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून डायरी खरेदी करण्याचे प्रमाण सातत्याने घटत आहे, असे प्रगती बुक डेपोच्या स्टेशनरी विभागाचे विशाल सावला यांनी दिली. मराठी तिथीचा समावेश असलेल्या किमान सात ते आठ डायरी प्रकाशित होत होत्या. त्यापैकी यावर्षी स्वामी समर्थ आणि श्री रामदास रोजनिशी या दोनच डायरी सध्या उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरी, लोकमान्य, गृहिणी आणि प्रवासी या रोजनिशिंना यापूर्वी चांगली मागणी असायची.पण, यंदा या रोजनिशी अजून आल्या नाहीत की बंद झाल्या हे अद्याप समजले नाही, असे सावला यांनी सांगितले.