लोकसभा निवडणुकीच्या प्रचार साहित्यामध्ये पुणेरी पगडी, विविध पक्षांच्या झेंडय़ाच्या रंगांची किनार आणि नेत्याची छबी असलेले फेटे यांसह आम आदमी पक्षाच्या टोप्यांना वाढती मागणी आहे. वेगवेगळय़ा पक्षांचे झेंडे, पदक (बिल्ले), विविध प्रकारची उपरणी, कापडी आणि मलमली बॅनर या साहित्याला सभांनुसार मागणीमध्ये वाढ होत आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी उमेदवारांकडे आता अवघ्या १३ दिवसांचा कालावधी उरला आहे. प्रचारामध्ये प्रतिस्पर्धी पक्षांवर आरोप-प्रत्यारोप होत असले तरी निवडणूक प्रचार साहित्याची विक्री करणाऱ्या बुधवार पेठ येथील मोती चौकातील मुरुडकर झेंडेवाले या दुकानामध्ये सर्व पक्ष गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. येथे विविध पक्षांच्या प्रचार साहित्याची शेजारी शेजारी मांडणी करण्यात आली आहे. प्रचार साहित्याची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना एका दृष्टिक्षेपात आपल्याला कोणत्या गोष्टी घ्यावयाच्या आहेत हे ध्यानात येते. भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे अनिल शिरोळे आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे हे उमेदवार आपल्या दुकानातून घेतलेल्या शाही उपरण्याचा वापर करीत असल्याची माहिती गिरीश मुरुडकर यांनी दिली.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पक्ष या राज्यातील प्रमुख पक्षांचे झेंडे, पक्षांची उपरणी, नेत्यांच्या प्रतिमा असलेली पदके, कापडी आणि मलमली बॅनर अशा साहित्याचा समावेश आहे. भाजप आणि मनसे यांच्या उमेदवारांसाठी निर्मिती केलेले फेटे, शिवसेना उमेदवारांसाठी संपूर्णपणे भगवी पगडी त्याच्या जोडीला शाही मलमली उपरणे असा संच एकत्रितपणे उपलब्ध आहे. नव्याने स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचे झेंडे, पदके, अरिवद केजरीवाल यांचे छायाचित्र असलेल्या कापडी टोप्या या प्रचार साहित्याला मोठी मागणी आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांना पक्षाकडून प्रचार साहित्य पुरविले जाते. मात्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवक-युवती स्वखर्चाने आपचे प्रचार साहित्य खरेदी करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे पक्षापेक्षाही वैयक्तिक स्वरूपाची होणारी खरेदी हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल, असेही मुरुडकर यांनी सांगितले.
 
सुगंधी प्रचार साहित्याला मागणी
निवडणूक प्रचारामध्ये ‘कार फ्रेशनर’ हे सुगंधी साहित्य नव्याने बाजारामध्ये आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), सोनिया गांधी (काँग्रेस), नरेंद्र मोदी (भाजप) आणि राज ठाकरे (मनसे) यांच्या प्रतिमांसह पक्षाचे चिन्ह असलेले कार फ्रेशनर उपलब्ध झाले आहेत. ५० रुपयांपासून १०० रुपये किमतीचे हे रूम फ्रेशनरसारखा सुवास देणारे कार हँिगग असून याचा सुगंध २५ दिवस टिकतो, असेही गिरीश मुरुडकर यांनी सांगितले.