शहरातील डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संख्येत पालिकेच्या आकडेवारीनुसार घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार तर पुण्यात डेंग्यूचे रुग्ण अगदीच कमी आहेत. शहरात दिसणारे चित्र मात्र या आकडेवारीपेक्षा उलटे असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सुरुवातीला डेंग्यूग्रस्तांची संख्या कमी होईल अशी डॉक्टरांना वाटणारी आशा फोल ठरली असून अजूनही रुग्णालये आणि नर्सिग होम्समध्ये डेंग्यूच्याच रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
पालिकेच्या नोंदीनुसार जुलैपासून शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यानंतर या संख्येत पुढचे तीन महिने सातत्याने वाढ होत राहिली. सप्टेंबरमध्ये एकाच महिन्यात डेंग्यूचे ९१८ संशयित रुग्ण आढळले. ऑक्टोबर महिन्यात मात्र ही संख्या निम्म्याहूनही घटल्याचे पालिकेची आकडेवारी सांगते. त्यानुसार चालू महिन्यात गेल्या २८ दिवसात शहरात डेंग्यूचे संशयित ४३५ रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडील डेंग्यूची आकडेवारी याच्या जवळपास देखील पोहोचत नाही. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेमार्फत तपासणी होऊन ज्यांना खात्रीने डेंग्यू झाला होता असे केवळ १६४ जण पुण्यात आढळले. रुग्णालये व नर्सिग होम्समधील सध्याची स्थिती पाहता मात्र या आकडेवाऱ्या कितपत खऱ्या मानाव्यात अशा गोंधळात नागरिक आहेत.
आठवडय़ापूर्वी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या घटेल अशी आशा डॉक्टरांकडून व्यक्त होत होती. ती सपशेल फोल ठरली असून अजूनही शहरातील बहुसंख्य रुग्णालये आणि नर्सिग होम्समध्ये डेंग्यूच्या रुग्णांचाच भरणा आहे. सुयश नर्सिग होमचे डॉ. संदीप बुटाला म्हणाले, ‘‘आमच्या नर्सिग होममध्ये अजूनही ८० टक्के डेंग्यूचेच रुग्ण दाखल होत आहेत. डेंग्यूग्रस्तांची संख्या कमी होत नसून प्लेटलेट्सचा तुटवडा देखील जाणवत आहे. अनेकदा नातेवाईकांना प्लेटलेट्स मिळवण्यासाठी फिरावे लागत आहे.’’
रुग्णालयांमध्ये आणि नर्सिग होम्समध्ये जागा मिळवण्यासाठी रुग्णांची फरपट होतच असल्याचे निरीक्षण डॉ. सचिन यादव यांनी नोंदवले. ते म्हणाले, ‘‘डेंग्यूचा उपद्रव अद्याप कमी झालेला नसून नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे. डेंग्यूच्या प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसून डेंग्यूच्या ५० ते ६० टक्के रुग्णांवर बाह्य़रुग्ण विभागातच उपचार करता येतात. पण जवळच्या ओळखीतील एखाद्याला डेंग्यू झालेला बघितलेले नागरिक भीतीपोटी आपल्या घरातील डेंग्यूग्रस्ताला रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे रुग्णालये आणि नर्सिग होम्समध्ये डेंग्यूग्रस्तांची गर्दी वाढते.’’
प्लेटलेट्सचा तुटवडा निर्माण होण्यात देखील भीतीचाच भाग मोठा असल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले. ‘प्रत्येक डेंग्यूग्रस्ताला प्लेटलेट्स द्यावे लागत नाहीत. गरज भासल्यासच त्या देणे अपेक्षित असते. पण नागरिकांच्या मनातील भीतीमुळे प्लेटलेट्सची संख्या जरा कमी झाली की लगेच ते रुग्णाला प्लेटलेट्स देण्याबाबत विचारणा करतात. त्यामुळे काही नर्सिग होम्समध्ये गरज नसतानाही प्लेटलेट्स भरण्याकडे कल दिसतो.’
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2014 रोजी प्रकाशित
डेंग्यू: पालिका म्हणते नाही; रुग्ण म्हणतात आहे!
दिवाळीच्या सुरुवातीला डेंग्यूग्रस्तांची संख्या कमी होईल अशी डॉक्टरांना वाटणारी आशा फोल ठरली असून रुग्णालये, नर्सिग होम्समध्ये डेंग्यूच्याच रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.

First published on: 29-10-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue pmc doctor hospital