deputy cm ajit pawar banners in pune not removed sword in hand | "समझने वाले को इशारा काफी है!" पुण्यात अजितदादांचे फ्लेक्स, हातात तलवार घेतलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण! | Loksatta

“समझने वाले को इशारा काफी है!” पुण्यात अजित पवारांचे फ्लेक्स; हातात तलवार घेतलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण!

पुण्याच्या कात्रज-आंबेगाव भागामध्ये अजित पवारांचे बॅनर्स लागले असून त्यावरील फोटो आणि मजकुरामुळे ते चर्चेत आले आहेत.

“समझने वाले को इशारा काफी है!” पुण्यात अजित पवारांचे फ्लेक्स; हातात तलवार घेतलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण!
अजित पवारांचे पुण्यात लागलेले बॅनर्स!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांवर गेल्या काही दिवसांमध्ये आयकर विभागानं ठिकठिकाणी धाडी घातल्या. त्यामुळे पवार कुटुंबीयांच्या सुरू असलेल्या चौकशीवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर सुरू असल्याची टीका देखील पवार कुटुंबासोबतच शिवसेना आणि काँग्रेसनं देखील वारंवार केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हातात तलवार घेतलेला फोटो लावलेले बॅनर्स पुण्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकाने हे बॅनर्स लावले असून अजित पवारांच्या हातातल्या तलवारीनं या चर्चेत अधिक भर टाकली आहे.

पुण्याच्या कात्रज-आंबेगाव परिसरात हे बॅनर्स लागले आहेत. या बॅनर्सवर अजित पवारांचा फोटो लावण्यात आला असून त्यांच्या हातात तलवार देखील दिसत आहे. फोटोच्या बाजूला “जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करू नये”, असा संदेश लिहिला आहे. याशिवाय, “समझने वाले को इशारा ही काफी है”, असं देखील फ्लेक्सवर लिहिण्यात आलं आहे.

बॅनर्स काढले जाणार नाहीत

दरम्यान, या बॅनर्सवर खाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक युवराज बेलदरे यांचं नाव आहे. बॅनर्सवरचा मजकूर आणि त्यावर अजित पवारांचा हातात तलवार घेतलेला फोटो यामुळे हे बॅनर्स पक्षातील वरीष्ठांनी काढायला लावल्याची चर्चा होऊ लागली होती. मात्र, हे बॅनर्स काढले जाणार नाहीत, पक्षाकडून असं काहीही सांगण्यात आलेलं नाही, असं युवराज बेलदरे यांनी सांगितलं आहे.

“असा कोणताही आदेश आलेला नाही. आजही फ्लेक्स तिथेच आहेत. दहा दिवसांपासून हे बॅनर्स लावले आहेत. काल लावला आणि आज काढला असं नाही. आजही तो फ्लेक्स तसाच आहे. त्या बाबतीत चुकीची बातमी फिरतेय”, असं ते म्हणाले. तसेच, “मोठ्या नेत्यांना तलवार भेट देण्याची आपली संस्कृती आहे, त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये”, असं देखील युवराज बेलदरे यांनी म्हटलं आहे.

तसेच, “अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही ते बॅनर्स लावले आहेत. पवार कुटुंबीयांवर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून छापे टाकले जात आहेत, त्यांच्या नातेवाईकांवर छापे टाकले जात आहेत, हे सूडबुद्धीचं राजकारण दिसून येत आहे. पण एखादी गोष्ट करायची म्हटलं तर ती करणारच ही अजित पवारांची पद्धत आहे आणि एखादी गोष्ट होणार नाही असं म्हटलं तर ती इतर कुणीही करू शकत नाही असा आमचा अनुभव आहे”, असं देखील बेलदरेंनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-10-2021 at 17:17 IST
Next Story
“अजित दादांनी आमच्यावरचं ग्रहण काढलं नाहीतर ते…”; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी