गणरायाचे दर्शन घेताना कार्यकर्त्यांच्या अरेरावीचा आणि दादागिरीचा प्रत्यय भक्तांना ठिकठिकाणी येत असला, तरी मंडळाने योग्य ती व्यवस्था केल्यामुळे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेताना भक्तांना कोणताही त्रास होत नसल्याचे चित्र ऐन गर्दीतही पाहायला मिळत होते. एकाही भक्ताच्या अंगाला हात लावायचा नाही, अशी सक्त सूचना मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना दिलेली असते, त्यामुळेच हे शक्य होते.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून आणि देशातूनही भाविक फार मोठय़ा संख्येने पुण्यात येतात. येणाऱ्या भाविकांमध्ये नारळाचे तोरण अर्पण करण्यासाठी आलेल्या भाविकांचे प्रमाण निम्म्याहून अधिक असते. त्यामुळे सर्वाना योग्यप्रकारे दर्शन घेता यावे तसेच तोरण अर्पण करण्यासाठी येणाऱ्यांनाही पुरेसा वेळ मिळावा अशी व्यवस्था उत्सव मंडपात करण्यात येते. भाविकांनी रांगेतून येऊनच दर्शन घेण्याची पद्धत येथे आहे.
मंडळाच्या परिसरात दर्शनासाठी होणारी गर्दी टप्प्याटप्प्याने सोडली जाते. त्यामुळे एकाच ठिकाणी गोंधळ होत नाही. ज्यांना मूर्तीजवळ जाऊन दर्शन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी वेगळ्या रांगा असतात आणि ज्यांना दुरून दर्शन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी वेगळ्या रांगा असतात. त्यासाठी लोखंडी कठडे उभारण्यात येतात, अशी माहिती सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी जे पोलीस असतात त्यांनी किंवा पोलिस मित्रांनी देखील लाठी-काठीचा वापर कुठेही करू नये. तसेच आमच्या एकाही कार्यकर्त्यांने एकाही भक्ताला चुकूनही हात लावू नये, अशी सक्त सूचना दिलेली असते. अशीच सूचना आम्ही आमच्या खासगी सुरक्षा यंत्रणेलाही दिलेली असते. त्यामुळे कितीही मोठी रांग असली, तरी भाविक चिडत नाहीत, अस्वस्थ होत नाहीत. कार्यकर्त्यांकडून भाविकांना चांगली वागणूक दिली जाते. त्यामुळे येणारा प्रत्येक भाविक समाधानी होऊनच आमच्या मंडपातून परततो, असेही रासने म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘दगडूशेठ’चे दर्शन घेताना भाविकांना शिस्तीचा प्रत्यय
गणरायाचे दर्शन घेताना कार्यकर्त्यांच्या अरेरावीचा आणि दादागिरीचा प्रत्यय ठिकठिकाणी येत असला, तरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेताना भक्तांना कोणताही त्रास होत नसल्याचे चित्र दिसते आहे.

First published on: 18-09-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotees feel discipline at dagdusheth ganpati